धरणग्रस्तांचे आंदोलन पुन्हा स्थगित
By admin | Published: April 9, 2016 01:53 AM2016-04-09T01:53:05+5:302016-04-09T01:53:05+5:30
विविध मागण्यांसाठी व धरणातून खाली सोडलेले पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी पुन्हा भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी धरणावर आलेल्या
भोर : विविध मागण्यांसाठी व धरणातून खाली सोडलेले पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी पुन्हा भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी धरणावर आलेल्या आंदोलकांना ११ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाने दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. कोणतेही ठोस आश्वासन न मिळताही दुसऱ्यांदा आंदोलन स्थगित करण्यात आले. पाडव्यामुळे आंदोलक कमी पोलीस अधिक अशी परिस्थिती होती.
२५ मार्चला भाटघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी व धरणातून बेकायदेशीर पाणी खाली सोडल्याने सुमारे ४० गावांतील नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी आलेल्या धरणग्रस्तांना अटक करून सोडून देण्यात आले होते. पुन्हा त्याच मागण्यांसाठी आंदोलन करण्यासाठी भाटघर धरणग्रस्त आले होते. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे आंदोलकांपेक्षा पोलीस बळच अधिक प्रमाणात होते. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव यांच्याशी चर्चा केली. ११ एप्रिलला जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेतले. या वेळी नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, शाखा अभियंता देवडे, पोलीस अधिकारी धरणग्रस्त समितीचे सरचिटणीस आनंदराव सणस, भगवान कंक, काळुराम मळेकर, पार्वती धुमाळ, बबन गोळे, माऊली दानवले, श्यामराव धुमाळ, रामचंद्र हिरगुडे, मारुती रहाटवडे, कृष्णा बोडके, शंकर मळेकर, अशोक दानवले व धरणग्रस्त उपस्थित होते.