बाह्यवळणाला दुसऱ्या दिवशीही विरोध
By admin | Published: August 28, 2015 04:32 AM2015-08-28T04:32:58+5:302015-08-28T04:32:58+5:30
‘एकच ध्यास नो बायपास’ अशी घोषणा देत नारायणगाव बाह्यवळण रस्ता मोजणीला सलग दुसऱ्या दिवशी बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्र्शविला. पुणे-नाशिक महामार्गावर त्यांनी
नारायणगाव : ‘एकच ध्यास नो बायपास’ अशी घोषणा देत नारायणगाव बाह्यवळण रस्ता मोजणीला सलग दुसऱ्या दिवशी बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्र्शविला. पुणे-नाशिक महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
सुमारे एक तास आंदोलन करणाऱ्या ५० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सायंकाळी सोडून देण्यात आले. चुकीच्या पद्धतीने बाह्यवळण केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असा इशारा आंदोलकांनी या वेळी दिला.
या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही दुतर्फा पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून वाहतूककोंडी झाली होती़
आज दिवसभर नारायणगाव येथे मोठा पोलीस बंदोबस्त होता़ आज सकाळी दहाच्या सुमारास नारायणवाडी ते वारूळवाडी हद्दीतील कोठारी व्हील्ससमोरील महामार्गापर्यंत अंतिम मोजणी करण्यात आली़ दरम्यान, वारूळवाडी येथील संतोष निंबाळकर या बाधित शेतकऱ्याने मोजणीस विरोध केला. प्रशासनाने कोणतीही मोजणीची नोटीस दिलेली नाही व त्यांचा सर्व्हे नंबर मोजणीच्या नोटीसमध्ये चुकीचा असल्याने त्यांनी मोजणी करू दिली नाही़
आज सकाळी बाधित शेतकऱ्यांची पुन्हा बैठक झाली. शेतकऱ्यांनी विविध प्रश्न मांडल्यानंतर जनरल मॅनेजर खोडसकर यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत सांगितले, की बाह्यवळण रद्द करणे हे आमच्या अधिकारात नसल्याने शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अथवा न्यायालयात दाद मागावी. मात्र बाह्यवळण हे होणारच असे सांगितले. लहान पूल, कालवा पूल, सेवा रस्ता व मुख्य रस्ता या संदर्भातील काही बदल हे तांत्रिक सल्लागार यांच्याशी चर्चा करून केले जातील़ आज सकाळी शेतकऱ्यांनी नारायणगाव बस स्थानकासमोर पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको केले. त्यानंतर आशा बुचके म्हणाल्या, की नारायणगावातून बाह्यवळण होत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे़ शिवसेना बाह्यवळण होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे म्हणाले, शेतकऱ्यांना कमजोर समजू नका़ आम्ही कोणाचीही मदत न घेता सनदशीर मार्गाने जाणार आहोत़ (वार्ताहर)