प्रस्तावित बीआरटीला विरोध

By admin | Published: November 17, 2016 03:51 AM2016-11-17T03:51:47+5:302016-11-17T03:51:47+5:30

बीआरटी (बसेससाठीचा स्वतंत्र मार्ग) मार्ग सुरू करण्याबाबत प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना विरोध म्हणून बुधवारी सकाळी सिंहगड रोड नागरी कृती समितीकडून सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.

Resistance to the proposed BRT | प्रस्तावित बीआरटीला विरोध

प्रस्तावित बीआरटीला विरोध

Next

पुणे : कात्रज, विश्रांतवाडी, नगर रस्त्याप्रमाणेच सिंहगड रस्त्यावरही बीआरटी (बसेससाठीचा स्वतंत्र मार्ग) मार्ग सुरू करण्याबाबत प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना विरोध म्हणून बुधवारी सकाळी सिंहगड रोड नागरी कृती समितीकडून सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. सिंहगड रस्ता विकास कृती समिती अशा नावाने सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र झाले असून त्यांनी पर्यायी रस्ता द्यावा, अशी मागणीही केली. समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर २२ नोव्हेंबरला बैठक घेण्याचे आश्वासन देऊन पालिका पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित करायला लावले.
सातत्याने वाहतूक कोंडी होत असलेला रस्ता म्हणून सिंहगड रस्त्याची ओळख होत चालली आहे. त्यावर पर्याय म्हणून पालिका प्रशासन तसेच वाहतुकीशी संबधित अन्य सरकारी कार्यालयांकडून या रस्त्यावर बीआरटी मार्ग सुरू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. परिसरातील नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे. त्याचा प्रत्यय त्यांनी बुधवारी सकाळी आंदोलनातून दिला. समितीचे अध्यक्ष हरिदास चरवड, यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आबा जगताप, मनोहर बोधे, अवधूत मते, कुलदीप चरवड, अनुराधा साळुंखे, अनंत दांगट, संदीप कडू, वीरेंद्र सैंदाणे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रशासनाला विरोध करणाऱ्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. बीआरटी मार्ग होऊ देणार नाही, पर्यायी रस्त्याचे काम सुरू करा, गर्दीच्या चौकांमध्ये स्काय वे बांधा अशा मागण्या असलेले फलक सर्वांनी हातात धरले होते. याविषयी बोलताना समितीचे अध्यक्ष हरिदास चरवड यांनी सांगितले की रस्त्याची मूळ रुंदी १२० फूट असली तरी प्रशासनाने त्याकडे कधीही लक्ष दिले नाही. त्यामुळे सध्या तो ८० फुटी झाला आहे. इतक्या रुंदीच्या रस्त्यावरून बीआरटी मार्ग केला तर त्याचा उपयोग होणार नाही व रस्ता रुंद केला तर त्यावर अनेक वर्षांपासून असणाऱ्या निवासी तसेच व्यावसायिक इमारती पाडाव्या लागतील.
तासभर सुरू असलेल्या या आंदोलनात नागरिकांनी रास्ता रोको मात्र केला नाही, त्याचा आवर्जून उल्लेख चरवड यांनी केला. आधीच त्रासलेल्या नागरिकांना आणखी त्रास द्यायचा नाही, असे ते म्हणाले. पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी जयंत भोसेकर तसेच पथ विभागातील अभियंता राहुल साळुंखे यांनी आंदोलकांची भेट घेतली. २२ नोव्हेंबरला समितीची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यावर आंदोलन थांबविण्यात आले.

Web Title: Resistance to the proposed BRT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.