विद्येच्या माहेरघरात जागेसाठी परवड

By Admin | Published: July 6, 2015 05:32 AM2015-07-06T05:32:07+5:302015-07-06T05:32:07+5:30

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.

Resource for premises | विद्येच्या माहेरघरात जागेसाठी परवड

विद्येच्या माहेरघरात जागेसाठी परवड

googlenewsNext

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. परंतु, शहरात चांगल्या शैक्षणिक संस्था असल्या तरी वसतिगृहांची संख्या बोटावर मोजण्याएवढीच असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर निवाऱ्याचा प्रश्न उभा राहत आहे.
त्यातच महाविद्यालयीन व खासगी वसतिगृहाचे हजारो रुपये शुल्क परवडत नाही. परिणामी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना भाडेतत्त्वावर खोली घेऊन किंवा नातेवाइकांकडे राहण्याचा पर्याय स्वीकारावा लागत आहेत. तसेच आदिवासी व समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांची क्षमता कमी असल्यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेणे अवघड जात आहे.
परिणामी ‘सांगा शहरात येऊन कसं शिकायचं,’ असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. शहरात समाजकल्याण विभागाची मुला-मुलींसाठी चार वसतिगृहे उपलब्ध आहेत. तसेच समाजकल्याण विभागाने तब्बल २८ संस्थांना वसतिगृह चालविण्यासाठी दिली आहेत. त्यातील काही बंद पडली आहेत. तसेच आदिवासी विभागाची तब्बल १७ वसतिगृहे असून त्यातील बहुतांश सर्व खासगी इमारतीमध्ये खोल्या घेऊन चालविली जात आहेत.
आदिवासी विभागाची घोडेगाव, मंचर, जुन्नर, खेड, ओतूर, हडपसर या ठिकाणी प्रत्येकी २; तर शेवाळवाडी, कोरेगाव पार्क, सोमवार पेठ, सांगवी, मांजरी येथे प्रत्येकी एक वसतिगृह आहे. मात्र, समाजकल्याण व आदिवासी विभागाकडील वसतिगृहांची प्रवेशक्षमता खूप कमी असल्यामुळे विद्यार्थीसंख्येवर मर्यादा येते. ज्यांना प्रवेश मिळतो त्यांनाच शिक्षण घेणे शक्य होते.
त्यामुळे आदिवासी विभागाने भोसरीजवळ तब्बल २ हजार क्षमतेचे वसतिगृह बांधले आहे. मात्र, वसतिगृहाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना अडगळीच्या खोल्यांंमध्ये राहून शिक्षण घ्यावे लागत आहे.(प्रतिनिधी)
-----------
गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश
फर्ग्युसन, गरवारे, वाडिया, स. प. महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा असते. तसेच याच महाविद्यालयातील वसतिगृहात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा असते. मात्र, महाविद्यालयात गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स. प. महाविद्यालयात एका वर्षासाठी २३ हजार शुल्क आणि गरवारे कॉलेजमध्ये ६१ हजार रुपये शुल्क आकारले जाते. परिणामी काही विद्यार्थ्यांना एवढे शुल्क भरता येत नसल्यामुळे महाविद्यालयाबाहेर राहण्याची व्यवस्था करावी लागते.
-----------
आदिवासी विभागाकडे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरात एकही स्वत:च्या मालकीची इमारत नाही. भाडेतत्त्वावर इमारत घेऊन मुला-मुलींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवार पेठेतील आदिवासी वसतिगृह मुलींना अस्वच्छ आणि कोंदट इमारतीत राहावे लागत आहे. त्यामुळे भोसरीजवळ बांधण्यात आलेल्या इमारतीचे काम तत्काळ पूर्ण करून सर्व मुला-मुलींची निवाऱ्याची व्यवस्था करावी.- सीताराम जोशी, अध्यक्ष, आदिवासी समाज कृती समिती

Web Title: Resource for premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.