मानाबरोबर ‘धना’तही वाढ
By admin | Published: August 9, 2016 01:14 AM2016-08-09T01:14:56+5:302016-08-09T01:14:56+5:30
पिंपरी - चिंचवड महापालिकेची विधी समितीची सभा सोमवारी झाली. त्यात १३३ नगरसेवकांचे मानधन साडेसात हजार रुपयांवरून थेट ५० हजार रुपये करण्याचा ठराव मंजूर केला.
पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेची विधी समितीची सभा सोमवारी झाली. त्यात १३३ नगरसेवकांचे मानधन साडेसात हजार रुपयांवरून थेट ५० हजार रुपये करण्याचा ठराव मंजूर केला. माजी आमदारांना मिळणाऱ्या पेन्शनच्या धर्तीवर माजी नगरसेवकांनाही पेन्शन द्यावी, असे धोरण ठरविले आहे. राज्य सरकारने या ठरावास मान्यता दिल्यास महापालिका तिजोरीवर वर्षाला सहा कोटींचा भार पडणार आहे.
महापालिकेत झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नंदा ताकवणे होत्या. विधानसभा आणि विधान परिषद सभासदांच्या मानधनात झालेल्या भरीव मानधनाच्या धर्तीवर महापालिका सदस्यांच्या मानधनातही वाढ करावी, पदाधिकाऱ्यांच्या पदानुसार मानधनात वेळोवेळी वाढ करावी, माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन सुरू करावे, असे ठरावात नमूद आहे. नगरसेवकांच्या मानधनावर होणारा खर्च महापालिका सोसत असल्याने नवीन ठरावास मान्यता द्यावी, असा राष्ट्रवादी नगरसेवकांचा आग्रह आहे़
बृहन्मुंबई महापालिका वगळता उर्वरित २५ महापालिकांतील नगरसेवकांना साडेसात हजार रुपये दरमहा मानधन देण्याची तरतूद आहे. मात्र, महापालिकांतील नगरसेवकांना महागाईच्या झळा पोहोचत असल्याने दूरध्वनी बिल, लेटरपॅड, व्हिजिटिंग कार्ड आणि सध्याचे साडेसात हजार रुपयांचे मानधन अपुरे पडते, असा सूर आहे. नगरसेवकांच्या मानधनात वाढ करावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या आर्थिक स्थितीला साजेसे पन्नास हजार रुपये मासिक मानधन मिळावे, असा ठराव विधी समितीने सोमवारी मंजूर केला.