जनसमुदायाच्या आदरायुक्त भावनेने डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:07 AM2020-12-07T04:07:42+5:302020-12-07T04:07:42+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध संस्था, दल, संघटना आणि राजकीय नेते ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध संस्था, दल, संघटना आणि राजकीय नेते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पुतळा परिसरात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत उपस्थित होते. दरवर्षी अतिशय उत्साहात जनसागर दिसून येत असे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून तुरळक गर्दीच्या स्वरूपात अभिवादन केले. नागरिकांनी मेणबत्ती लावून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. तर काहींनी पुष्पहार अर्पण करूनही अभिवादन केले. नागरिकांनी फोटो काढण्याचा आनंदही लुटला. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे बाहेरच्या परिसरात वाहतूककोंडी झाली नाही. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी पोलिसांना सहकार्य केल्याचे दिसून आले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पोलीसही या शिबिरात सहभागी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
----
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र यावा. समाजाचे तुकडे होऊ नयेत. बाबासाहेब कधीही थांबले नाहीत. त्यांनी नेहमी अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्याचप्रमाणे आताही दलित आणि कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देत राहू.
प्रकाश साळवे, पुणे शहराध्यक्ष, दलित पँथर
----
काही नागरीक संविधानासंदर्भात अज्ञान राहिलेले आहेत. सर्व जाती धर्माचा विचार करूनच बाबासाहेबांनी संविधान लिहिले आहे. सर्वांनी समानतेने वागायला हवे.
- सुखदेव सोनवणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, दलित पँथर
---
बाबासाहेबांना आदरांजली वाहताना शब्द आणि सुमन यापेक्षा कृतीतून काहीतरी होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात. हा रक्तदान शिबीर भरवण्यामागचा हेतू आहे.
-उमेश चव्हाण, अध्यक्ष,रुग्ण हक्क परिषद
.------
आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले,
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन दिल्ली पुरते मर्यादित राहणार नाही असे विधान शरद पवारांनी केले आहे. परंतु, काही झाले तरी कायदा रद्द होणार नाही. त्यामध्ये फक्त बदल केला जाईल. तसेच सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा तयार केला आहे. त्या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली. कायदा होण्याअगोदर असे काही नव्हते. प्रश्न फक्त एमएसपीचा होता. तो केंद्र सरकार ऑन पेपर एम एसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही. देशात केलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी सर्वांना शुभेच्छा आहेत.