कोरोनामुक्त रुग्णांमध्ये वाढताहेत श्वसनाचे विकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:01+5:302020-12-02T04:06:01+5:30
पुणे : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ‘पोस्ट कोव्हिड’ आजारपण हे डोकेदुखी ठरु लागले आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना पुढील दोन-तीन ...
पुणे : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ‘पोस्ट कोव्हिड’ आजारपण हे डोकेदुखी ठरु लागले आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना पुढील दोन-तीन महिने सर्दी, खोकला, थकवा, डोळयांवर येणारा ताण असा त्रास जाणवत आहे. मध्यम किंवा गंभीर स्वरुपाच्या कोरोनामधून बाहेर पडलेल्या रुग्णांना श्वसनाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. अनेक रूग्णांमध्ये फुफ्फुसाचा फायब्रोसिस झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना स्नायू, सांधेदुखी आणि अंगदुखीचा त्रास जाणवतो. कोरोनातून बरे झालेल्या १०० रूग्णांपैकी १५ टक्के रूग्णांना थकवा जाणवत आहे; ७ टक्के रूग्णांमध्ये फुफ्फुसाचा फायब्रोसिस झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मधुमेह, उच्चरक्तदाब, क्रोनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), दमा आणि लठ्ठपणा असणा-या लोकांना अधिक त्रास होऊ शकतो. कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर न्यूमोनिया झालेल्यांना दीर्घकालीन काळजी घ्यावी लागते, असे निरिक्षण पल्मोनोलॉजिस्ट डॉ. कुंदन मेहता यांनी नोंदवले.
----------------------
कोरोनापश्चात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर काळजी घेणे आवश्यक असते. कोरोनानंतर फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झालेली असते. त्यामुळे स्पायरोमीटरच्या सहाय्याने वर्षभर लक्ष ठेवावे लागते. गरज भासल्यास एक्स-रे आणि स्कॅनिंग करुन घ्यावे. रुग्णांची प्रतिकारशक्तीही कमी झालेली असते. त्यामुळे इतर व्याधींचा सामना करावा लागू शकतो. रक्त गोठण्याची प्रक्रियाही वेगाने होते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्लयाने रक्त पातळ होण्याची औषधे घ्यावी लागतील का, याबाबत जाणून घ्यावे. झोपेच्या, जेवणाच्या, व्यायामाच्या वेळा काटेकोरपणे पाळाव्यात व मानसिक संतुलन संभाळावे.
- डॉ. मिलिंद भोई, कान-नाक-घसा तज्ज्ञ
---
*कोरोनानंतर काय काळजी घ्यावी?
*नियमित व्यायाम करावा.
*औषधांचे नियमित सेवन करा.
*पौष्टिक आहाराचे सेवन करा. ताजे फळे, भाज्या, मसूर, बियाणे आणि डाळींचा आहारात समावेश करावा.
* मास्कचा वापर, सामाजिक अंतर व स्वच्छ पाळा.
* धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
*पुरेशी विश्रांती घ्या आणि योग किंवा ध्यान करा.