चुलीच्या धुरामुळे श्वसनसंस्थेस विकारांचा धाेका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 08:49 PM2018-07-23T20:49:25+5:302018-07-23T20:50:21+5:30
घरातील चुलीच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदुषणाने महाराष्ट्रातील आदिवासी जमातींमधील महिला व लहान मुलांच्या श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दर्शविणारा महत्त्वपूर्ण अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानवशास्त्र विभागाच्या चारुलता द. नांद्रे यांनी नुकताच पूर्ण केला आहे.
पुणे : घरातील चुलीच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदुषणाने महाराष्ट्रातील आदिवासी जमातींमधील महिला व लहान मुलांच्या श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दर्शविणारा महत्त्वपूर्ण अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानवशास्त्र विभागाच्या चारुलता द. नांद्रे यांनी नुकताच पूर्ण केला आहे.
मानवशास्त्र विभागातील प्रा. शौनक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या अभ्यासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले. या अभ्यासासाठी नांद्रे यांनी महादेव कोळी व भिल्ल या आदिवासी जमातींची निवड केली होती. सह्याद्री पर्वतरांगांमधील ’आहुपे’ हे महादेव कोळ्यांचे आणि सातपुडा पर्वतरांगांमधील ’सावर’ हे भिल्ल जमातीचे गाव या मोहिमेंतर्गत अभ्यासण्यात आले. स्वयंपाक करण्याच्या पद्धती, घरबांधणीसाठी वापरण्यात येणारी सामुग्री, उपलब्ध जागा आणि वेळीच घ्यावी लागणारी वैद्यकीय मदत यानिकषांचा श्वसनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. याचबरोबर, अतिशारिरीक श्रमांचा पोषकघटकांवर परिणाम होऊन बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) कमी होण्याची शक्यता वाढते; आणि याचाही अप्रत्यक्ष परिणाम श्वसनसंस्थेवर होऊ शकतो. याचबरोबर, पावसाळ्यात गवरयांचा वाढलेला वापर, चुलीचा स्वयंपाकाव्यतिरिक्त
करावा लागणारा वापर यांमुळेही पावसाळ्यामध्ये महादेव कोळी महिलांमध्ये श्वसनसंस्थेतील गुंतागुंत वाढते. याचबरोबर, भिंतीचा ओलसरपणा, ओले लाकूड यांमुळेही आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे या अभ्यासामध्ये आढळून आले.
या संशोधनांतर्गत जुन्या पद्धतीच्या घरांचा अभ्यासही करण्यात आला. मात्र जुन्या, मातीची बांधकामे असलेल्या घरांच्या तुलनेत सिमेंटच्या भिंती असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या महिलांच्या श्वसनसंस्थेस अधिक धोका असल्याचेही आढळून आले. मातीच्या घरामध्ये भिंतीमध्ये तुलनात्मकदृष्ट्या धूर शोषला जातो; मात्र सिमेंटच्या भिंती असल्यास असे घडत नसल्याने अधिक धोका निर्माण होतो. याचबरोबर पावसाळ्याच्या तुलनेमध्ये उन्हाळ्यात धुराचा अधिक त्रास होत असल्याचेही अभ्यासाअंती निष्पन्न झाले. गेली अनेक दशके माता व बाल आरोग्यविषयक अनेक कार्यक्रम विविध देशांमध्ये राबविले जात आहेत. महिला व लहान मुले दगावु शकण्याचे प्रदुषण हे आठवे सर्वाधिक महत्त्वाचे कारण आहे. विशेषत: ग्रामीण भागांमध्ये ही शक्यता आणखी धोकादायक बनते. मात्र आदिवासी भागांमधील यासंदर्भातील परिस्थितीवर प्रकाश पडलेलाच नाही. या पार्श्वभूमीवर, नांद्रे यांचा हा अभ्यास अत्यंत संवेदनशील आहे.