राज्यात पावसाची विश्रांती; शेतकरी प्रतिक्षेत, सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस
By श्रीकिशन काळे | Published: July 9, 2023 05:15 PM2023-07-09T17:15:42+5:302023-07-09T17:20:33+5:30
पुढील दोन तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज
पुणे : सध्या मॉन्सून सर्वत्र व्यापला असला तरी पाऊस काही जोरदार पडत नाही. त्यामुळे शेतकरीराजा मनातून पावसा पावसा पड रे! अशीच साद घालत असेल. जुलै महिना सुरू होऊन आठवडा उलटला तरी देखील राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. कोकण, घाटमाथ्यावर मात्र चांगला पाऊस होत आहे. इतर ठिकाणी आणि मराठवाडा-विदर्भात वरूणराजाची वाट पाहिली जात आहे. येत्या दोन तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस झाला आहे.
सध्या प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झालेली आहे. एल निनो स्थितीमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, देशात सरासरीइतकाच पाऊस पडण्याचा अंदाज दिलेला आहे. देशभरात पाऊस पडत असला, तरी त्याची तीव्रता दर वर्षीच्या तुलनेत कमी आहे. राज्यामध्ये काही भागात जोरदार पावसाला पोषक हवामान आहे. माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीपेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. ईशान्य अरबी समुद्र आणि दक्षिम गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. हे चक्राकार वारे वायव्य राजस्थान आणि शेजारच्या भागात समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. हे वारे दक्षिणेकडे झुकलेले आहे. किनारपट्टीला समांतर कमी दाबावाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत विस्तारला आहे.