बारामतीत संचारबंदीला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:16+5:302021-04-05T04:10:16+5:30
निर्बंधासह अंशत: संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. संध्याकाळी ६ वाजता शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात येत आहेत. शहर पोलीस ...
निर्बंधासह अंशत: संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. संध्याकाळी ६ वाजता
शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात येत आहेत. शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व
कर्मचारी वर्ग दररोज संध्याकाळी ६ च्या सुमारास लाऊडस्पिकरवरून सूचना देत
दुकाने बंद करत आहेत. किरकोळ अपवाद वगळता बारामतीकरांचा देखील या संचारबंदीस प्रतिसाद मिळत आहे.
बारामती शहरात मागील महिन्यापासून रूग्णसंख्या सातत्याने वाढत आहे.
परिणामी बारामती शहर व तालुक्यामध्ये हॉटस्पॉटची संख्या वाढली आहे. शहरात
१८ तर ग्रामीण भागात ३ ठिकाणी हॉटस्पॉट प्रशासनाच्या वतीने जाहीर केले
आहेत. मात्र तरीही रूग्णसंख्या कमी होत नसल्याचे प्रशासनाने शेवटी अंशत:
संचारबंदीचा निर्णय घेतला. राज्य सरकारने देखील रविवारपासून ‘विकेंड लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. परिणामी रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करीत आहे. मात्र सायंकाळी सहानंतर रस्त्यावर नागरिकांची गर्दी काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. शहरात आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याच्या निर्णयावर दर्शविला आहे. सर्वत्र हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पार्सल सेवा सुरु आहे. मात्र इतर आस्थापनांना दिवसभर परवानगी दिली असताना हॉटेल व्यावसायिकांना परवानगी नाकारल्याने हॉटेल व्यावसायिकांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली. सर्व कारखाने व आस्थापनांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, समारंभांना परवानगी दिली जात नाही. दहावी बारावीच्या नियोजित परीक्षा वगळता सर्व शाळा व महाविद्यालयांचे कामकाज येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे गर्दी कमी झाली आहे. शासकीय नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
बारामती नगरपरिषद हद्दीतील सायंकाळी सहानंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एखाद्या ठिकाणी दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्यास त्याचा अहवाल प्रांत कार्यालयाला पाठवण्यात येत आहे. त्यानंतर संबंधित दुकान पुढील दोन आठवड्यांसाठी बंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
- किरणराज यादव
मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद