सायकल शेअरिंगला प्रतिसाद, स्मार्ट सिटीची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:00 AM2018-03-06T04:00:47+5:302018-03-06T04:00:47+5:30
पुण्याच्या वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रदूषणातही लक्षणीय वाढ होत आहे.
पुणे - पुण्याच्या वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रदूषणातही लक्षणीय वाढ होत आहे. यावर उपाय शोधून पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत सायकल शेअरिंग योजना शहरात राबविण्यात येत असून, या योजनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एक रुपया अर्ध्या तासासाठी या पद्धतीने या सायकली वापरण्यास मिळत असल्याने पुणेकर आवर्जून या सायकलीची रपेट मारत आहेत.
पेडल या कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत असून, सध्या औंध, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्ता व या भागात ही योजना राबविण्यात येत आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्याार्थ्यांबरोबरच शहरात कामानिमित्त येणाºया नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. सुरुवातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ही योजना सुरू करण्यात आली. तिला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने शहराच्या इतर भागांत ही योजना राबविण्यात येत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सायकल स्टेशन तयार करण्यात आली असून, तेथून सायकल वापरण्यास मिळते. सायकल ही पेडल या कंपनीच्या संकेतस्थळावरून किंवा अॅपच्या माध्यमातून भाड्याने घेता येते. यासाठी मोबाईलमध्ये पेटीयम असणे आवश्यक आहे. या सायकल चालविण्यास सोप्या आहेत तसेच सामान ठेवण्याचीसुद्धा त्यात व्यवस्था करण्यात आली असल्याने महिलांचा प्रतिसादही चांगला आहे. सायकल एका स्टॅँडवरून घेतल्यानंतर ती दुसºया एखाद्या स्टँडवरच लावणे आवश्यक आहे. स्टँडची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या सायकलींना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली असल्याने ही सायकल कुठे आहे, हे कळण्यास मदत होते.
नागपूरहून पुण्याला फिरण्यासाठी आलेला पीयूष आगरवाल म्हणाला, ‘‘नागपूरहून पुण्याला फिरण्यासाठी आलो आहे. इथे आल्यानंतर या सायकल योजनेचे माहिती मिळाली. ही सायकल भाड्याने घेणे अगदी सोपे आहे. दोन दिवसांपासून आम्ही या सायकलच्या माध्यमातूनच फिरत आहोत. नागपूरमध्येही योजना लवकर सुरू व्हावी’’ पुण्यात शिक्षणासाठी आलेला उज्ज्वल पाटील म्हणाला, ‘‘मी मॉडर्न महाविद्यालयात शिकतो. तेथून विविध ठिकाणी जाण्यासाठी मला या सायकलचा उपयोग होतो.’’ नाममात्र दरात या सायकल उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. शहराच्या इतर भागातही ही योजना राबवायला हवी.
मी गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेते. मला या सायकल योजनेमुळे खूप फायदा झाला आहे. व्यायामासाठी तसेच इतर कामांसाठी मी या सायकलचा वापर करते. यात सामान ठेवण्यासाठी कॅरेज असल्याने अडचण होत नाही.
- तेजस्विनी जाधव, विद्यार्थिनी
४या सायकल योजनेला चांगला प्रतिसाद जरी मिळत असला, तरी काही समाजकंटकांकडून या सायकलींची तोडफोड करण्यात येत आहे. तसेच, स्टँड ऐवजी वेगळ्या ठिकाणी या सायकल सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाºयांना या सायकल कोठे आहेत ते शोधून पुन्हा स्टँडवर आणाव्या लागतात. तसेच, तोडफोड केली असल्यास तिची डागडुजीही करावी लागते.