कोरोनाबाधितांसाठी प्राणायम शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:41+5:302021-05-16T04:09:41+5:30
-- पाटेठाण : दौडच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, तालुक्यात अनेक ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्यात आले ...
--
पाटेठाण : दौडच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, तालुक्यात अनेक ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण दाखल होत आहेत. या रुग्णांंचा आत्मविश्वास वाढावा, तसेच त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम व रोग शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
राहु (ता. दौंड) येथील स्व. सुभाष अण्णा कुल, तसेच शारदा आरोग्य मंदिर बोरीभडक (ता. दौंड) येथील विलगीकरण कक्षामध्ये असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी सिद्ध समाधी योग या सेवाभावी संस्थेच्या वतीने मोफत प्राणायाम व रोग शिबिर वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
सिद्ध समाधी योग अर्थात एसएसवाय संस्थेचे सत्य सैनिक दौंड तालुक्यातील सहा विलगीकरण कक्ष तसेच श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा व बेलवंडी आदी ठिकाणी कोविड रुग्णांच्यामध्ये जाऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. योग व प्राणायामामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढत असून दररोज योग करण्याची गरज आहे.
शिबिरासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक श्रीकृष्ण चौधरी, सुधाकर बंड, संदीप सोनवणे हे परिश्रम घेत आहेत. सिद्ध समाधी योग स्वंयसेवक कोविड सेंटरमध्ये जाऊन मोफत योग शिबिर घेत सहकार्य करत असून कौतुकास्पद असल्याचे पंचायत समिती सदस्य सुशांत दरेकर यांनी सांगितले. --
१) कोट-
मला कोरोनाची लागण झाली, मात्र लक्षणे अगदी सौम्य होती. तरीदेखील मी घरात न विलग होता थेट बोरीभडक येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल झालो. तेथे योग व प्राणायामामुळे मला खूप लवकर लक्षणे नाहीशी झाली. शिवाय सकाळी प्राणायम केल्यावर दिवसभर उत्साही वाटत होते.
- सचिन म्हेत्रे (रुग्ण)
--
फोटो क्रमांक : १५पाटेठाण
फोटो ओळी : बोरीभडक (ता. दौंड) येथील विलगीकरण कक्षामधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी सिद्ध समाधी योग या सेवाभावी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेले प्राणायाम शिबिराचे दृष्य.