Nana Patekar: ‘भारत माता की जय’ म्हणून जबाबदारी संपत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:01 PM2021-10-18T21:01:58+5:302021-10-18T21:32:24+5:30
आमचे खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. आम्ही फक्त कचकडयाचे असतो. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमच्या कार्याला ख-या अर्थाने ‘सलाम’...अशा शब्दांत जवानांविषयीची कृतार्थ भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.
पुणे : आमचे खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. आम्ही फक्त कचकडयाचे असतो. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमच्या कार्याला ख-या अर्थाने ‘सलाम’...अशा शब्दांत जवानांविषयीची कृतार्थ भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. परंतु, अशाच प्रसंगांच्या वेळी आम्ही तुमची आठवण काढतो. खरंतर सामान्य माणसांनी दैनंदिन जीवनातही जवानांचे स्मरण ठेवले पाहिजे. केवळ ‘भारत माता की जय’ म्हटलं म्हणजे जबाबदारी संपत नाही, असे सांगत त्यांनी सामान्यांचे कान टोचले.
1971 च्या भारत-पाक युद्धाच्या विजयी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे ‘विजयी मशाल’ फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये आणण्यात आली होती. नाना पाटेकर यांच्यासह लहान मुलांनी फुगे हवेत उडवून या विजयाचा जल्लोष केला. त्यानिमित्त एफटीआयआयच्या मुख्य थिएटरमध्ये आयोजित कार्यक्रमात पाटेकर बोलत होते. यावेळी 1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये सहभागी झालेल्या शहीद बबन रामचंद्र चव्हाण यांची वीरपत्नी सुनीता तसेच विंग कमांडर सुरेश दामोदर कर्णिक (निवृत्त), लेफ्टनंट कमांडर रवींद्रकुमार नारद(निवृत्त), मेजर उदय परशुराम साठे(निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त) यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे मेजर जनरल संदीप भार्गव एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला उपस्थित होते. पाटेकर म्हणाले, ''प्रहार चित्रपटाच्या निमित्ताने वयाच्या 40 व्या वर्षी कमांडो चा कोर्स पूर्ण केला. तो अत्यंत विलक्षण अनुभव होता. कारगिल युद्धाच्या वेळी मी कुपवाड्याला होतो. एक सैनिक म्हणून ते त्यांचे आयुष्य कसे समर्पित करतात हे मी जवळून पाहिले आहे. पण दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की आम्ही अशाच प्रसंगांच्या वेळी तुमची आठवण काढतो. तुमच्यामुळे आम्ही आहोत हे आम्ही विसरून जातो. केवळ ‘भारत माता की जय’ म्हटलं की जबाबदारी संपत नाही. आपण ठरविले तर खूप काही करू शकतो. शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलू शकतो. इतके जरी केले तरी खूप काही केल्यासारखे आहे.''
एफटीआयआयविषयी बोलताना पाटेकर पुढे म्हणाले, एफटीआयआय आणि माझ्या इमारतीची भिंत कॉमन आहे. पण ती भिंत ओलांडून कधी मला या संस्थेत येता आले नाही. कधी कधी वाटतं की आलो नाही ते चांगलेच झाले. कलाकार या नात्याने सुख-दु;खाची अनुभूती घेतली नाही तर मला कलाकार म्हणवण्याचा काही अधिकार नाही. मी आयुष्यभर माझी भूमिका निभावत राहाणार आहे. पुस्तके वाचण्यापेक्षा रोज नवीन लोकांना भेटणे, त्यांची सुखदु;ख जाणून घेणे मला जास्त गरजेचे वाटते. त्यांच्यापेक्षा आपली सुखदु:ख खूप वेगळी आहेत. कलाकारांची लढाई वेगळी आहे. काल त्यांनी केलेलं काम लोक विसरून जातात. त्यामुळे ज्यांच्या हातात खूप काही आहे. ते किमान मूठभर देऊ शकतात. त्यांनी ते द्यायला हवं. संदीप भार्गव म्हणाले, 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या विजयी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे ही ‘विजयी मशाल’ पुण्यातील ऐतिहासिक स्थळांसह युद्धाच्या ठिकाणच्या आसपासच्या गावांंमध्ये नेली जाणार आहे.