आईच्या पालनपोषणाची जबाबदारी मुलांवरच
By Admin | Published: May 13, 2014 01:56 AM2014-05-13T01:56:40+5:302014-05-13T02:00:45+5:30
दुसर्याच्या घरी राबून तिने स्वत:चा संसार केला... पदरात पक्षाघात झालेला पती आणि शारीरिक-मानसिकरीत्या अपंग मुलासह तीन मुले... परदेशात स्वयंपाकी बनून काम करत राहिली...
पुणे : दुसर्याच्या घरी राबून तिने स्वत:चा संसार केला... पदरात पक्षाघात झालेला पती आणि शारीरिक-मानसिकरीत्या अपंग मुलासह तीन मुले... परदेशात स्वयंपाकी बनून काम करत राहिली... कष्टाच्या पैशाने पुण्यात घर घेतले... धाकट्या मुलालाही सहमालक केले... ज्या मुलांवर तिने आयुष्य ओवाळून टाकले... त्यातल्याच धाकट्याने घर बळकाविण्यासाठी आईसह इतरांना त्रास देऊन नाकीनऊ केले. ६३व्या वर्षीही कष्टाने शरीराबरोबरही तिचे मनही कणखर झाले होते. या वयात ती हिमतीने न्यायालयाची पायरी चढली अन जिंकलीही. या प्रकरणी सुशीला (६३) आणि त्यांचा मुलगा आशिष (३८, दोघांची नावे बदलली आहेत) यांनी अॅड. कविता शिवरकर यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. सुशीला यांनी आपला मुलगा सुभाष आणि सून रमा (नावे बदलली आहेत) यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. सुशीला या त्यांच्या पती, आई आणि मुलासह मुंबई येथे राहत होत्या. त्यांच्या पतीला पॅरेलिसिसचा झटका आल्यामुळे कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी स्वयंपाक आणि धुणी-भांडी करण्याचे काम सुरू केले. घरची जबाबदारी आईवर पडललेली पाहून मोठ्या मुलाने शिक्षण सोडून काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा एक मुलगा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग आहे. मुलांना नीट शिक्षण देता आले नाही म्हणून त्यांनी सुभाषला चांगले शिक्षण द्यायचे ठरविले. त्याला बेंगळुरु येथे नौदलामध्ये शिकविण्यास पाठविले. मात्र, त्याने शिक्षण अर्धवट सोडले. त्याला दुबई येथे कामासाठी त्यांनी नेले. मात्र, तिथे एका मुलीच्या प्रेमात पडून त्याने मोठ्या भावाच्या आधीच लग्न केले. मोठा मुलगाही दुबई येथे असल्यामुळे त्या परत माघारी आल्या. मुंबई येथील त्यांचे राहते घर अपुरे पडेल म्हणून सुशीला यांनी ते घर विकून पुण्यात घर घेतले. पुण्यात आपल्या कुटुंबाबरोबर त्या राहू लागल्या. एक मुलगा अपंग असल्यामुळे सुशीला त्याला घर देतील या कारणावरून सुभाष व रमा यांनी भांडण करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली. त्यांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला; तसेच पाच हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)