"पीएमपी पुन्हा सुरू करा..." पुणे ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने कामगार व विद्यार्थ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 05:42 PM2022-12-05T17:42:47+5:302022-12-05T17:43:00+5:30

पुण्याच्या ग्रामीण भागात २६ नोव्हेंबरपासून ही बससेवा बंद करण्यात आली

Restart PMP Plight of workers and students as bus services in rural areas of Pune are closed | "पीएमपी पुन्हा सुरू करा..." पुणे ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने कामगार व विद्यार्थ्यांचे हाल

संग्रहित छायाचित्र

googlenewsNext

वेल्हे : तालुक्यात विंझर ते कात्रजदरम्यान पीएमपीएलची बससेवा सुरू करण्यात आली होती; परंतु २६ नोव्हेंबरपासून ही बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, कामगार व प्रवासी यांचे अतोनात हाल होत आहेत. पीएमपीएल सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांसह विद्यार्थी व कामगारांनी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रवाशांनी नुकतेच पीएमपीएलचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांना दिले आहे.

एसटीची सेवा बंद असल्याने ग्रामीण भागात मागील वर्षी पुणे महानगरपालिकेने पीएमआरडीच्या हद्दीमध्ये पीएमपीएलची बससेवा सुरू करण्यात आली होती. यामध्ये विंझर ते कात्रज अशी बससेवा सुरू करण्यात आली होती. या बससेवेचा फायदा येथील विद्यार्थी, कामगार, महिलावर्ग कर्मचारी आदींना होत होता. बससेवा सुरू झाल्याने पुणे शहराशी वेल्हे तालुका जोडला गेला. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी वेल्ह्यातील विद्यार्थी पुणे शहरात दररोज जाऊ लागले होते. तसेच, अनेक बेरोजगार युवक बस सुरू झाल्याने शिवापूर वेळू, वरवे, शिरवळ, पुणे, कात्रज आदी परिसरात रोजगारासाठी दररोज जाऊ लागले होते. तालुक्यातील महिला वर्गदेखील मोठ्या संख्येने घराबाहेर पडला होता. बेरोजगारांना या बससेवेमुळे रोजगार मिळण्यास मदत झाली होती. विद्यार्थी वर्गासाठी ही बससेवा मोठी पर्वणी ठरली होती, कारण अभियांत्रिकी, मेडिकल, संगणकशास्त्र असे विविध शाखांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी दररोज या बससेवेमुळे ये- जा करत होते. तसेच तालुक्यातील शासकीय कर्मचारी यांनादेखील ही सेवा फायदेशीर ठरत होती. सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच या वेळेत हे सर्व कर्मचारी वेळेत उपस्थित राहत होते. कामगार, विद्यार्थी, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक सर्व प्रवासी बससेवेमुळे आनंदी होते; परंतु २६ नोव्हेंबरपासून बससेवा बंद झाल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका राणी भोसले, रायबा भोसले यांनी पीएमपीएल प्रशासनाची भेट घेऊन बससेवा सुरू करण्याबाबत विनंती केली आहे. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीदेखील यासंदर्भात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी धनाजी वालगुडे, शांताराम उफाळे, पिंटू रणखांबे, सुनील राजीवडे, सोमनाथ दामगुडे, मोहन दरडिगे आदी उपस्थित होते. 

Web Title: Restart PMP Plight of workers and students as bus services in rural areas of Pune are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.