फ्रंटलाईन आरोग्य सेवकांसाठी ५० लाखांची विमा योजना पुन्हा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:15+5:302021-04-21T04:10:15+5:30
चाकण : कोरोना महामारीच्या संकटसमयी फ्रंटलाइनवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्यसेवकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा ...
चाकण : कोरोना महामारीच्या संकटसमयी फ्रंटलाइनवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्यसेवकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा विमा संरक्षण योजनेचा लाभ पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत दिला जात होता. परंतु केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक काढून २४ मार्च रोजी या योजनेची मुदत संपल्याचे कारण देत ही योजनाच रद्द केली. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट देशभरात पसरली असल्यामुळे आरोग्य सेवकांसाठीची ही विमा संरक्षण योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना पाठवलेल्या लेखी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या पत्रात खा. कोल्हे म्हणाले की, गतवर्षी कोविड १९ विषाणूच्या संसर्गामुळे कोरोना महामारी ही जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत देशभरात फ्रंटलाइनवर आरोग्य सेवा देताना ज्या आरोग्य सेवकांचा मृत्यू होईल त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा विमा संरक्षण योजना राबविण्यात आली. परंतु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक परिपत्रक काढून २४ मार्च २०२१ रोजी मुदत संपल्यामुळे ही विमा संरक्षण योजना बंद करण्यात आल्याचे राज्य सरकारांना कळवले आहे.
दरम्यान, एक वर्षानंतर देखील कोरोना महामारीचा पूर्णपणे नायनाट झाला नाही. या उलट दुसरी लाट देशभरात पसरली असून, दररोज २ लाख ५० हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत याकडे लक्ष वेधून खा. डॉ. कोल्हे यांनी कोरोनाचे संकट गतवर्षीपेक्षा अधिक भयंकर रुप धारण करत आहे. अशा भीषण परिस्थितीमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्य सेवक जीव धोक्यात घालून अहोरात्र झटत आहेत. त्यात केंद्र सरकारने ५० लाख रुपयांची विमा योजना बंद करणे म्हणजे एक प्रकारे त्यांचे नैतिक खच्चीकरण केल्यासारखा प्रकार आहे, असे नमूद केले आहे. तसेच देशभरात लाखो आरोग्य सेवक जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांची अहोरात्र सेवा करत आहेत. त्यांचे विम्याचे संरक्षण कवच काढून घेण्याचा हा निर्णय अमानवीय ठरेल असे सांगून जोपर्यंत कोरोना महामारीचा देशातून पूर्णपणे नायनाट होत नाही, तोपर्यंत सर्व आरोग्य सेवकांसाठीची विमा संरक्षण योजना सुरू असणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत बंद केलेली ही विमा योजना पुन्हा सुरू करावी अशी जोरदार मागणी खा. कोल्हे यांनी केली आहे.