ह्रद्यरोगाला आमंत्रण देणाऱ्या पाव, बिस्कीट, फरसाणवर आले हे निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:24+5:302021-01-08T04:34:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पाव, ब्रेड, बिस्किटे आदी बेकरी उत्पादनांपासून चिप्स, फरसाणांपर्यंतचे लोकप्रिय पदार्थांचे अतिसेवन आरोग्याची हानी करणारे ...

Restrictions on bread, biscuits, and farsan invite heart disease | ह्रद्यरोगाला आमंत्रण देणाऱ्या पाव, बिस्कीट, फरसाणवर आले हे निर्बंध

ह्रद्यरोगाला आमंत्रण देणाऱ्या पाव, बिस्कीट, फरसाणवर आले हे निर्बंध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पाव, ब्रेड, बिस्किटे आदी बेकरी उत्पादनांपासून चिप्स, फरसाणांपर्यंतचे लोकप्रिय पदार्थांचे अतिसेवन आरोग्याची हानी करणारे आहेत. या पार्श्वभूमीवर अशा ‘रेडी टू कूक’ किंवा ‘’रेडी टू इट’ पदार्थांमधल्या ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण किती असले पाहिजे यावर निर्बंध आणले गेले आहेत. ट्रान्स फॅटचे अतिसेवन ह्रदयरोगाला आमंत्रण देणारे असतात. त्यामुळे या पदार्थांमधील तसेच तेलामधील ट्रान्स फॅटचे प्रमाण ५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने घेतला आहे.

या निर्बंधांमुळे शरीरातील वाढत्या कोलेस्टेरॉलला काहीसा ‘ब्रेक’ लागणार आहे. खाद्य पदार्थांमधील ट्रान्स फॅटचे प्रमाण २०२१ मध्ये ३ टक्क्यांवर आणि २०२२ मध्ये २ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने घेतला आहे. ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडच्या वाढत्या वापरामुळे भारत ह्रदयरोगाची राजधानी बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने येत्या २०२३ पर्यंत जग ‘ट्रान्स फॅट’ मुक्त करण्याचा निर्धार केला आहे.

चौकट

ट्रान्स फँटमुळे पोखरते शरीर

ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडमुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल अर्थात ‘एलडीएल कोलेस्टेरॉल’चे प्रमाण वाढते, तर चांगल्या कोलेस्टेरॉलचे अर्थात ‘एचडीएल कोलेस्टेरॉल’चे प्रमाण कमी होते. यामुळे मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होणे, स्थुलता हे आजार बळावतात. त्यामुळेच बिस्कीट, चिप्स, नमकीन, एकाच तेलात पुन्हा-पुन्हा तळलेले पदार्थ (वडे, भजी इत्यादी) यात ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे पदार्थ ‘डोळस’पणे खाल्ले पाहिजेत, असे आवाहन आहार तज्ज्ञांनी केले.

चौकट

“सर्व प्रकारच्या तेलांमध्ये ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडचा समावेश असतो. हे फॅटी अ‍ॅसिड ह्रदयासाठी अत्यंत घातक असते. दररोजच्या आहारात प्रक्रीयायुक्त, तयार खाद्यपदार्थांचे प्रमाण वाढले आहे. बेकरी उत्पादने, रेडिमेड फूड, केक, फरसाण, चिप्स आदींमध्ये चव, पोत, टिकाऊपणा वाढवण्यासाठी, किंमत कमी करण्यासाठी ट्रान्स फॅटचा वापर केला जातो. जागरुक नागरिकांनी कोणतेही अन्नपदार्थ खरेदी करताना त्यावरील ‘न्युट्रिशनल फॅक्ट’ तपासून घ्याव्यात. पदार्थ पुन्हा-पुन्हा त्याच तेलात तळले तरी त्यातही ‘ट्रान्स फॅट’ तयार होतात.”

- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

चौकट

-आपली आहाराची पध्दत पूर्णपणे बदलली आहे. इंटरनॅशनल फूड चेन, ‘इझी टू कूक’ पदार्थांचे आकर्षण वाढले त्यामुळे आहारातील ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाणही वाढले आहे.

-त्यामुळेच ट्रान्स फॅटचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय अत्यंत आवश्यक होता. ‘ट्रान्स फॅट फ्री इंडिया’ या मोहीमेमुळे अन्न उत्पादक कंपन्यांना आता आवश्यक बदल करावे लागतील. प्रत्येक पदार्थावर घटकांचे प्रमाण नमूद करणे सक्तीचे आहे; मात्र, त्याचे प्रमाणीकरण झालेले नाही. सर्वसामान्य लोक जागृत झाले तरच कंपन्यांनाही निर्णयाची दखल घेऊन बदल करावे लागतील.

- कस्तुरी भोसले, आहारतज्ज्ञ

Web Title: Restrictions on bread, biscuits, and farsan invite heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.