कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धर्मादाय कार्यालयाच्या वेळेवर बंधने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:50+5:302021-03-18T04:10:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वेळा आवाहन करूनही विभागीय धर्मादाय कार्यालयात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक वेळा आवाहन करूनही विभागीय धर्मादाय कार्यालयात पक्षकार गर्दी करीत आहेत. मुख्यत्वे संस्थांशी निगडित कामे असल्याने किमान तीन चार संस्थाचालक एका केसच्या सुनावणीसाठी येत आहेत. वाढत्या गर्दीमुळे कार्यालयातील सुमारे १५ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोरोना संसर्गित झाले आहेत. त्यामुळे सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत. त्यानुसार न्यायिक कामकाज हे सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत चालणार असून कार्यालयाची वेळ दुपारी ४ वाजेपर्यंतच ठेवण्यात आली आहे.
विभागीय धर्मादाय कार्यालयातील कामकाज बुधवारपासून (दि.१७) मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यात आले आहे. शासन आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत कार्यालयीन कर्मचारी चक्राकार पद्धतीने पन्नास टक्के उपस्थित असतील. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वकील संघटनेने सर्व वकील व पक्षकारांना गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ अति तातडीच्या प्रकरणामध्येच काम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अँड. मुकेश परदेशी यांनी दिली. तसेच वकिलांनीही काम झाल्यावर कार्यालयात थांबू नये यासाठी वकील कक्ष बंद ठेवला असल्याचे अँड. राजेश ठाकूर यांनी सांगितले.
--------------------------
स्वेच्छेने बंधन पाळणे आवश्यक
कोरोना प्रकोपाच्या पुनश्च वाढीने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागीय कार्यालय असल्याने सोलापूर, अहमदनगर, सातारा व पुणे जिल्ह्यांतील वकील व पक्षकार येत असतात. किमान पंधरा दिवस तरी या सर्वांनी कार्यालयात येणे टाळण्याचे बंधन स्वेच्छेने पाळून सहकार्य करावे - अँड. शिवराज प्र. कदम जहागिरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे
.....