सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येण्यावर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:11 AM2021-04-05T04:11:02+5:302021-04-05T04:11:02+5:30
पुणे : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात पाठवू नये. ...
पुणे : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात पाठवू नये. तसेच विद्यापीठांतील कर्मचारी वगळता अन्य व्यक्तींनी विद्यापीठात न येता आपल्या कामाबद्दल ई-मेल अथवा दूरध्वनीद्वारे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून विद्यापीठातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यातही विद्यापीठात रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा विद्यापीठाबाहेरून येणारे कर्मचारी अधिक कोरोनाबाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठात येण्याबाबत निर्बंध घालण्यात आले असून आता बाहेरील व्यक्तींना विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही. सर्व पत्रव्यवहार ऑनलाइन, ई-मेलद्वारे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या नातवाईकांसाठी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी शेठ तारांचद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालय ट्रस्टच्या सहयोगाने लसीकरण करण्यात येत आहे.
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवर आणली आहे. तसेच अतिरिक्त कामेही बंद केली आहेत. परीक्षा होताच कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणखी कमी केली जाणार आहे, असेही डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.