कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार- डॉ. अभिनव देशमुख
By कुणाल गवाणकर | Published: September 20, 2020 10:44 PM2020-09-20T22:44:17+5:302020-09-20T22:46:31+5:30
देशमुख यांनी स्वीकारला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार
पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असल्याचे दिसत असून ज्या भागात तो अधिक पसरतोय, तेथील चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तेथील कंन्टेंमेट झोनमधील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहे. कोरोनाशी लढताना निष्काळजीपणा न दाखविता सर्तक राहणे गरजेचे असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
डॉ. अभिनव देशमुख यांनी रविवारी बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते.
डॉ. अभिनव देशमुख यांच्या पत्नीही डॉक्टर आहेत. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना डॉ. देशमुख दाम्पत्याने कोरोना संसर्गात केलेले काम कौतुकास पात्र ठरले. पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये आता कोरोना प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. याविषयी बोलताना डॉ. देशमुख यांनी सांगितले की, पूर्वी कोरोनाविषयी असलेली भिती आता कमी झाली आहे. मात्र, त्याचबरोबर निष्काळजी न करता सतर्क राहिले पाहिजे. कोरोनाची लागण झाली तरी ९० टक्के रुग्ण बरे होतात. मात्र, त्याचबरोबर काळजी घेतली पाहिजे. मास्क, सामाजिक अंतर हे नियम पाळले पाहिजेत. त्याचबरोबर लक्षणे दिसली तर तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यात काम करताना बºयाच गोष्टी डोक्यात आहे. सध्या पोलीस व प्रशासकीय यंत्रणा काम करीतच आहे. त्याचा आढावा घेऊन कोणत्या भागात अधिक लागण झाली आहे. तेथील कंन्टेंमेंट झोनचे निर्बध अधिक कडक करुन त्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
डॉक्टर पतीपत्नी कोरोनाविरोधी लढ्यात अग्रभागी
डॉ. अनिभव देशमुख यांच्या पत्नी सोनाली देशमुख याही डॉक्टर आहेत. त्यांचे शिक्षण आणि बालपण मुंबईत गेले. क्रांती अग्रणी जी. डी. (बापू) लाड यांच्या त्या नात आहेत. कोल्हापूरात सीपीआरमध्ये स्त्रीरोगतज्ञ म्हणून त्या सेवा बजावतात़ कोरोना कक्षात त्याही रुग्णसेवेत आहेत.त्याचवेळी डॉ. अभिनव देशमुख हे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कोल्हापूरमध्ये कोरोना विरोद्धच्या लढ्यात अग्रभागी राहून काम करीत होते.