खेड तालुक्यात आजपासून निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:25+5:302021-02-23T04:15:25+5:30
राजगुरुनगर: गेल्या आठवडाभरापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकांच्या हलगर्जीपणामुळे बाधितांची संख्या ...
राजगुरुनगर: गेल्या आठवडाभरापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकांच्या हलगर्जीपणामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याचे समोर आले असून खेड तालुक्यात आजपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, ज्या भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त असेल त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्याबरोबरच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी खेड तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सूचना केल्या. यावेळी तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, चाकणचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. संसर्गजन्य आजारावर जर खासगी डॉक्टर उपचार करणार असेल तर उपचारापूर्वी संबंधित रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी घ्यावी, अशा सूचनाही आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांची मर्यादा ठेवण्यात आली असून, त्यासाठी रीतसर परवानगी घेण्याबरोबरच लग्नसोहळ्याचे चित्रीकरणही द्यावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणारे वधूवर मंडळी तसेच कार्यालय मालक यांचेवरही आता थेट गुन्हाच दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अंत्यविधी, दशक्रिया आणि कोणतेही कार्यक्रमात ५० लोकांपेक्षा जास्त एकत्र दिसून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
एसटी बसमधून प्रवास करताना अनेक प्रवासी मास्क घालत नाही. त्यांना विनंती करुनही ते दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रवासी जर मास्क लावत नसेल तर चालकाने बस नजीकच्या पोलीस ठाण्यात नेऊन संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल करावा, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. दरम्यान, कंपन्यामधील बसमधून जाणाऱ्या कामगारांनी मास्क वापरण्याबाबत सक्त सूचना कंपन्यांना नोटीस पाठवून देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या ज्या ठिकाणी अधिक आहे तो परिसर कंटेन्मेंट झोन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ज्या भागात, परिसरात कोविड रुग्ण सापडला सदर भाग कंटेन्मेंट झोन करण्याबाबतच्या सक्त सूचना देऊन
कोरोना रुग्णाच्या संपर्कातील २०-२५ व्यक्तींचा शोध घेण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेसह आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे.
... तर १५ दिवस दुकान होणार सील
बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. लोकांकडून मास्कचा वापर टाळला जात असतानाच अनेक दुकांनामध्ये विनामास्क काम करणारे कामगार, तसेच त्या ठिकाणी सॅनिटायझरसारखी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ दंडात्मक कारवाई होणार नाही तर त्याचबरोबर संबंधित व्यापाऱ्याचे दुकान १५ दिवसांसाठी सील करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
२१ राजगुरुनगर कोरोना
खेड पोलिसांनी दुचाकीवर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.