ग्रामीण भागातील निर्बंध आठवडाभर कायम राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:51+5:302021-06-01T04:09:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र निर्बंध आणखी आठवडाभर कायम राहणार आहेत. पॉझिटिव्हिटी रेट दहापेक्षा जास्त असल्याने निर्बंध हटविण्याबाबत निर्णय घेतलेला नाही, असे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
राज्य शासनाने ज्या भागात २९ मेपूर्वी पाॅझिटिव्ह दर दहा टक्क्यांच्या खाली आला तर निर्बंध शिथिल करता येईल, असे जाहीर केले आहे. परंतु २९ मे रोजी जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह दर ११.३ टक्के असल्याने ग्रामीण भागातील निर्बंध कायम राहणार असल्याचे डाॅ. देशमुख यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागातदेखील रुग्णसंख्या पाॅझिटिव्ह दर दहा टक्क्यांच्या खाली आला असल्याने पुढील आठवड्यात ग्रामीण भागातदेखील निर्बंध शिथिल होतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’अंतर्गत १ जूनपासून निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ज्या जिल्ह्यात व महापालिका क्षेत्रात पाॅझिटिव्ह दर १० टक्क्यांपर्यंत खाली आला असेल, त्याठिकाणी काही निर्बंध शिथिल करता येतील. निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र रुग्णसंख्या वाढत होती; परंतु आता ग्रामीण भागातदेखील रुग्णसंख्या कमी होत आहे. २९ मे रोजी ग्रामीण भागातील पाॅझिटिव्ह दर ११.३ होता. गेल्या दोन दिवसांत तो १० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पुढील काही दिवसांत तो ८ ते ९ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे डाॅ. देशमुख यांनी स्पष्ट केले; परंतु सध्यातरी ग्रामीण भागात निर्बंध कायम राहतील.
----
खरीप हंगामाची तयारी
ग्रामीण भागात सध्या सर्वत्र खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. यासाठी ग्रामीण भागात निर्बंध कायम असले तरी शेती उपयोगी खते, औषधे, बी-बियणे, शेती अवजारे आदी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.