पुण्यात निर्बंध कडक, अकोला-बुलडाण्यात शिथील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:25 AM2021-03-13T02:25:43+5:302021-03-13T02:26:29+5:30

पुणेकर रात्री दहाच्या आत घरात; नागपुरात आजपासून ९ दिवस कडक लॉकडाऊन

Restrictions tight in Pune, relaxed in Akola-Buldana | पुण्यात निर्बंध कडक, अकोला-बुलडाण्यात शिथील

पुण्यात निर्बंध कडक, अकोला-बुलडाण्यात शिथील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/अकोला : लॉकडाऊन लागणार का, याबद्दल पुणेकरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असणारा संभ्रम शुक्रवारी दूर झाला.  उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीनंतर पुण्यात लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मात्र पुणे पूर्ण लॉक केले जाणार आहे. दुसरीकडे अकोला आणि बुलडाणा या विदर्भातील दोन शहरांत मात्र शनिवार-रविवार या दोन दिवसांच्या संपूर्ण संचारबंदीत शिथीलता देत फक्त रात्रीची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

पवार यांनी पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. उद्यानेही संध्याकाळी बंद ठेवण्याची सूचना केली. लग्न समारंभ, इतर कार्यक्रमांना ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा आहे. बाजारपेठा, मॉल, चित्रपटगृहेदेखील रात्री दहापर्यंतच सुरू राहतील. रेस्टॉरंट्स फक्त ५० टक्के उपस्थितीतच चालू ठेवा, अशी ताकीद पवारांनी दिली. 

अकोला :  संपूर्ण बंदचा आदेश मागे 
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण बंदचा आदेश मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील मात्र, सायंकाळपासून संचारबंदी कायम असणार आहे. 

नागपूर : गाेरेवाडा जंगल सफारीही ‘लाॅकडाऊन’ 
शहरातील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय व जंगल सफारी येत्या १५ ते २१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. महापालिका तसेच जिल्हाधिकारी यांनी शहरात लावलेल्या टाळेबंदीच्या निर्णयानंतर वनविभागातर्फे गाेरेवाडाचे गेटही पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. 

जळगाव  : पुन्हा एकदा ठप्प, बाजारपेठ बंद
१२ ते १४ मार्च दरम्यान तीन दिवसीय जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यासह नागरिकही घराबाहेर न पडल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील मंडळी व प्रवासीच रस्त्यावर दिसत असल्याचे पहिल्या दिवशी चित्र होते.  

नाशिक : कठोर निर्बंधाचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र नाशिककरांकडून बेफिकिरी दाखविली जात असल्याने परिस्थिती सुधारली नाहीच तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिला. येत्या रविवारी परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मांढरे यांनी जाहीर केले. 

परभणी : दोन दिवस संचारबंदी
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील नागरी भागात शनिवार व रविवार अशी दोन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून १५ मार्चच्या सकाळी ६ वाजेपर्यंत परभणी महानगरपालिका क्षेत्र व ५ किमीचा परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायती आणि परिसरातील ३ किमीचा परिसर या भागात संचारबंदी लागू केली आहे.  

शेगाव : पाॅझिटिव्ह रुग्णांचा संताप
शु्क्रवारी सकाळचे जेवण दुपारी दोन वाजेपर्यंतही न आल्याने पाॅझिटिव्ह रुग्णांनी कोविड सेंटरच्या परिसरात येत संताप व्यक्त केला. केवळ सिलिंडर संपल्याने जेवणास उशीर झाल्याचे समजले. 

 

Web Title: Restrictions tight in Pune, relaxed in Akola-Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.