पुण्यातील 'अतिसंक्रमणशील' भागातील निर्बंध शिथिल; मात्र 'फिजिकल डिस्टन्सिंग' पालन गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 09:26 PM2020-04-23T21:26:01+5:302020-04-23T21:26:18+5:30
कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आढळून आल्याने २२ व २३ एप्रिल या दोन दिवशी दुध व्यतिरिक्त सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश..
पुणे : शहरातील कोरोना बाधितांची वाढत्या संख्येमुळे अतिसंक्रमित भागात पोलिसांनी गेले दोन दिवस अतिशय कडक निर्बंध लागू केले होते़ ते आता शिथिल केले आहेत. असे असले तरी या भागात जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंतच सवलत देण्यात आली आहे. अन्य भागातील दुकाने ही सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत.
शहराच्या पूर्व भागातील समर्थ, खडक, फरासखाना व कोंढवा पोलीस ठाणे सर्व कार्यक्षेत्र तसेच स्वारगेट, बंडगार्डन, दत्तवाडी, येरवडा, खडकी तसेच वानवडीच्या काही भागात कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आढळून आल्याने २२ व २३ एप्रिल या दोन दिवशी दुध व्यतिरिक्त सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. हा आदेश शिथिल करण्यात आला आहे.
आता या भागात जीवनावश्यक किराणा साहित्य खरेदीसाठी सकाळी १० ते १२ यादरम्यान लोकांना घराबाहेर पडता येईल. मात्र, त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा पाळून खरेदीसाठी गर्दी करु नये.
शहराच्या पश्चिम भागातील डेक्कन, सिंहगड रोड, कोथरुड, औंध, पाषाण, बाणेर, कात्रज, धनकवडी या भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत, असा आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढला आहे.