राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची पुनर्रचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:22+5:302021-05-29T04:09:22+5:30
पुणे : राज्यावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास आणि त्यावरील उपाययोजना शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात आले. या प्राधिकरणाची ...
पुणे : राज्यावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास आणि त्यावरील उपाययोजना शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात आले. या प्राधिकरणाची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये राजेंद्र पवार, प्रभाकर देशमुख, संजय लाखे पाटील, महेश कांबळे आणि रवी सिन्हा या पाच सदस्यांची निवड करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री या प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणून काम करतील. मदत आणि पुनर्वसन मंत्री, मुख्य सचिव आदी पदसिद्ध म्हणून असतातच. अतिवृष्टी, पूर, भूकंप आणि चक्रीवादळाची कारणे आणि त्यावर खबरदारी म्हणून काय उपाययोजना करायच्या या नैसर्गिक आपत्तींचा प्रामुख्याने अभ्यास केला जाणार आहे.
मागील काही वर्षांत राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना अनेक घटना घडल्या आहेत. भौगोलिक स्थिती आणि बदलते हवामान यामुळे सातत्याने धोका संभवत आहे. या प्राधिकरणच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आणि या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ आदी नवीन सदस्यांचा यात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती प्राधिकरणचे सदस्य आणि निवृत्त सचिव राजेंद्र पवार यांनी दिली.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार हे प्राधिकरण त्या-त्या वेळच्या नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करून शासनाला उपाययोजनांचा अहवाल सादर करणार आहे. त्यासाठी या प्राधिकरणची कार्यपद्धती, कार्यकक्षा आणि अधिकार निश्चित करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.