दहावीचा सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:34+5:302021-06-02T04:09:34+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील तब्बल १३ लाख १६ हजार ७६ विद्यार्थ्यांनी ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील तब्बल १३ लाख १६ हजार ७६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात पुणे विभागातील मुलांची संख्या १ लाख २६ हजार ६०६, तर मुलींची संख्या १ लाख ४ हजार ३३७ एवढी होती. पुणे विभागात पुणे, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो.
राज्य शासनाने निकाल जाहीर करण्यासाठी स्वीकारलेले सूत्र धोरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर योग्य असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. परंतु ,काही विद्यार्थी व पालकांच्या मनात याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
------
शासनाने दहावीच्या निकालासाठी मूल्यांकनाचे नियमावली प्रसिद्ध केली असली, तरी काही शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या फारशा परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिले जाणारे गुण योग्य असतील किंवा नाही याबद्दल शंका वाटते.
- मयूर जाधव, विद्यार्थी
----------------
प्रत्यक्षात परीक्षा देऊन मिळवलेले गुण आणि शिक्षकांनी वेगवेगळ्या स्तरावर केलेल्या मूल्यमापनाच्या आधारे दिले जाणारे गुण यात फरक आहे. विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
- गंधार देऊसकर, विद्यार्थी
---------
कोरोनाची स्थिती पाहता दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध नव्हता. त्यातल्या त्यात नववी व दहावीमध्ये झालेल्या परीक्षेमधील गुणांच्या आधारे निकाल तयार करण्यामगे एक तर्क आहे. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णय योग्य आहे .
- डॉ. गोविंद नांदेड, माजी प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य
----------
सध्या परिस्थितीमध्ये यापेक्षा कोणताही चांगला मार्ग उपलब्ध नव्हता. निकाल जाहीर करण्यासाठी केलेली ही तडजोड आहे. त्यामुळे यात काही कमी-जास्त बाबी राहून जातात. शासनाने स्वीकारलेल्या मार्गाव्यतिरिक्त वेगळा मार्ग असू शकतो, असे मला वाटत नाही.
- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
------
शासन आदेशानुसार निकाल तयार करण्यासाठी आवश्यक बाबींवर राज्य मंडळाकडून काम सुरू आहे. येत्या ३ जूनपर्यंत निकालासाठी आवश्यक असणारा आराखडा प्रसिद्ध केला जाईल. त्यासंदर्भातील व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शाळांना विद्यार्थ्यांचे गुण पाठवण्यात अडचण येणार नाही.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
------------------------
शाळांमार्फत घेतल्या जाणा-या विविध परीक्षांना विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेइतके गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनावर जाहीर केल्या जाणा-या निकालावर समाधान वाटत नाही. परीक्षा झाल्या नसत्या तर विद्यार्थ्यांच्या निकालात चार ते पाच टक्क्यांनी वाढ झाली असती.
- मनोहर पोळेकर, पालक
--------------
असे असेल दहावीच्या निकालाचे सूत्र?
विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीमध्ये मिळवलेले गुण तसेच इयत्ता दहावीमध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
--------
राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार असला तरी या निकालाच्या आधारे इयत्ता अकरावीत गुणवत्तेप्रमाणे प्रवेश मिळणार आहे का? तसेच इयत्ता अकरावीसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु, तंत्रनिकेतनमधील प्रवेशासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
-------