लालफितीत अडकला मुस्लिम विद्यार्थ्यांचा निकाल : अल्पसंख्यांक विभागाचे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 12:17 PM2019-06-05T12:17:24+5:302019-06-05T12:20:48+5:30

मुस्लिम विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होवून दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप गुणपत्रक दिले गेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

Result of Muslim students stuck in red zone : ignored minority department | लालफितीत अडकला मुस्लिम विद्यार्थ्यांचा निकाल : अल्पसंख्यांक विभागाचे दुर्लक्ष 

लालफितीत अडकला मुस्लिम विद्यार्थ्यांचा निकाल : अल्पसंख्यांक विभागाचे दुर्लक्ष 

Next
ठळक मुद्देतंत्र शिक्षण विभागाकडून पाठपुरावा सुरू

पुणे: अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होवून दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप गुणपत्रक दिले गेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अल्पसंख्यांक विभागाने याबाबत परिपत्रक काढल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा गुणपत्रक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु,तंत्र शिक्षण विभागाने दोन वर्ष पाठपुरावा केल्यानंतरही शासनाकडून परिपत्रक प्रसिध्द झाले नाही.त्यामुळे अनेक मुस्लिम विद्यार्थ्यांचा निकाल लालफितीच्या कारभारात अडकून पडला आहे.

राज्य शासनातर्फे २०१४ मध्ये मुस्लिम व मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्यात आले होते. त्यानुसार मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळाले होते. मुस्लिम गटासाठी विशेष मागास प्रवर्ग -अ अंतर्गत शैक्षणिक प्रवेशासाठी व नोकरभरतीसाठी आरक्षण प्राप्त झाले होते. मात्र, त्यावर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. दरम्यानच्या काळात झालेले शैक्षणिक प्रवेश आबाधित ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ईएसबीसी मराठा आरक्षणामध्ये झालेले सर्व प्रवेश कायम ठेवण्यात आले. परंतु, मुस्लिम आरक्षणाबाबत कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. 
आरक्षण लागू न झाल्याने संबंधित विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त होणार नाहीत. जात प्रमाणपत्रा अभावी त्यांचे विद्यापीठाचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. तसेच शैक्षणिक संस्थांकडून त्यावर काय कार्यवाही करावी, याविषयी तंत्रशिक्षण विभागाकडे विचारणा होत आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी तंत्रशिक्षण कार्यालयात व विद्यापीठात गुणपत्रिका मिळण्यासाठी फे-या मारत आहेत.गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातील सुमारे १०० ते १५० विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. त्यात काही विद्यार्थ्यांना केवळ द्वितीय वर्षांची गुणपत्रिका दिली नाही तर काहींना अंतिम वषार्ची गुणपत्रिका देण्यात आली नाही. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी व पुढील शिक्षणासाठी गुणपत्रिका सादर करता येत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
---------------
अभियांत्रिकी प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाले आहेत.संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित ठेऊन कोणताही हेतू साध्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देवून हा प्रश्न निकाल काढणे योग्य होईल. परंतु, त्यासाठी अल्पसंख्यांक विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढणे गरजेचे आहे, असा पत्रव्यवहार तंत्रशिक्षण संचालक कार्यालयाकडे पुणे विभागातील तंत्र शिक्षण अधिका-यांनी केला आहे.
.......
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत.मी आळंदीच्या एमआयटी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शाखेची परीक्षा दिली. माझे द्वितीय वषार्चे गुणपत्रक अद्याप दिले गेले नाही. मला महाविद्यालयाकडून विद्यापीठात आणि विद्यापीठातून तंत्र शिक्षण विभागात पाठविले जाते. गेल्या दोन वर्षांपासून गुणपत्रिका मिळाण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.पुणे विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्याचे दिसून येत आहे. गुणपत्रिका नसल्याने मला नोकरी व पुढील शिक्षणासाठी अडचण येत आहे.
 - महिबूब खान,विद्यार्थी 

Web Title: Result of Muslim students stuck in red zone : ignored minority department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.