‘नाटा’चा निकाल वादाच्या भोवऱ्यात, अनेकांनी घेतला आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:45 AM2018-06-08T05:45:32+5:302018-06-08T05:45:32+5:30
देशातील वास्तुशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्टरचा (नाटा) निकाल वादाच्या भोव-यात अडकला आहे.
पुणे : देशातील वास्तुशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्टरचा (नाटा) निकाल वादाच्या भोव-यात अडकला आहे. निकाल जाहीर करण्यापासून ते विद्यार्थ्यांना रेखाचित्र (ड्रॉर्इंग) विषयात मिळालेल्या कमी गुणांवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. काही विद्यार्थ्यांना तर शून्य गुण मिळाले आहेत. यावर वास्तुशास्त्र परिषदेच्या काही सदस्यांनीही नाराजी व्यक्त
केली आहे.
मागील काही वर्षांपासून देशातील वास्तुशास्त्र महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी परिषदेकडून ‘नाटा’ ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा दि.२९ एप्रिल रोजी झाली. या परीक्षेला देशभरातून ४९ हजार ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४४ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून एकूण ३० हजार ५६० विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा अंतिम निकाल ‘नाटा’ संकेतस्थळावर दि.६ जून रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, त्यापूर्वी तीन वेळा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. पहिल्यांदा दि. १७ मे रोजी गणित व सामान्य बुद्धिमत्ता पेपरचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर दोन काही प्रश्नांवर हरकती आल्याने पुन्हा सुधारित निकाल दि. २४ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर दि.४ जून रोजी रेखाचित्र पेपरचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला.
या निकालानंतर अनेक विद्यार्थी व पालकांना धक्का बसला. काही विद्यार्थ्यांना रेखाचित्र पेपरला शून्य गुण मिळाले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा खूप कमी गुण मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली. याबाबत काही विद्यार्थ्यांनी परिषदेकडे तक्रारी करूनही त्यात सुधारणा झालेली नाही. बुधवारी (दि.६) परिषदेने अंतिम निकाल जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. भारतीय कला प्रसारणी सभेच्या वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्कर कानविंदे म्हणाले, ‘काही विद्यार्थ्यांच्या शून्य गुण मिळाल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनी या पेपर सोडविला असेल तर त्यांना शून्य गुण मिळू शकत नाहीत.’ काही पालकांनीही कानविंदे यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ‘रेखाचित्र या पेपरला शून्य गुण मिळणे बुद्धिला पटत नाही. तसेच माझ्या मुलीलाही अपेक्षेपेक्षा ३० गुण कमी मिळाले आहेत. त्यामुळे या परीक्षेत गोंधळ झाल्याचे स्पष्ट होते,’ असे एका पालकांनी सांगितले.
पहिल्यांदाच एवढा गोंधळ
मागील आठ वर्षांपासून परिषदेकडून ‘नाटा’ ही परीक्षा घेतली जात आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच असा गोंधळ झाला आहे, अशी नाराजी परिषदेतील एका सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शून्य गुण मिळणे हा खूप गंभीर विषय आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे परिषदेने याबाबत तातडीने समिती स्थापन करून चौकशीचा निर्णय घ्यायला हवा. याबाबत परिषदेने बैठक बोलवावी. त्यामध्ये हा मुद्दा उचलून धरू, असेही संबंधित सदस्याने स्पष्ट केले.