सेट परीक्षेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 05:25 AM2018-05-25T05:25:05+5:302018-05-25T05:25:05+5:30
एकूण ४ हजार ६७ विद्यार्थी पात्र ठरले असून, परीक्षेचा निकाल ६.५२ टक्के लागला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सहायक प्राध्यापक पदांसाठीच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. एकूण ४ हजार ६७ विद्यार्थी पात्र ठरले असून, परीक्षेचा निकाल ६.५२ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात २.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र व गोव्यामध्ये दि. २८ जानेवारी रोजी सेट परीक्षा घेण्यात आली. दोन्ही राज्यांतून एकूण ६२ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यांपैकी ४ हजार ६७ विद्यार्थी सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. मागील वर्षी या परीक्षेचा निकाल ३.९२ टक्के लागला होता. या वर्षी त्यामध्ये २.६० टक्क्यांची वाढ झाली असून ६.५२ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षेचा पॅटर्न बदलल्याने निकाल वाढला आहे.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ६ टक्के विद्यार्थी पात्र करण्याचे धोरण स्वीकारले आहे. तसेच, तिन्ही पेपरना उत्तीर्णतेची अट बदलण्यात आली असून सरासरी उत्तीर्णतेएवढे गुण मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.