तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम! पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्याने मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:47 AM2021-05-17T11:47:31+5:302021-05-17T12:05:11+5:30
मुळशीत उडाले घरांचे पत्रे, विद्युत तारा तुटण्याच्या प्रमाणात वाढ
पुणे: तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वारे आणि पावसाचे प्रमाण वाढले आहे. जिल्हयातील ग्रामीण भागात जोरदार वादळी वाऱ्याने झाडापडीसोबतच घरांचे पत्रे उडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही गावात विद्युत तारांचे खांब कोसळून ताराही तुटल्या आहेत. अशाच परिस्थितीत मुळशी तालुक्यात खाम्बोली गावातील अंगणवाडीचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याची घटना घडली आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा मदतीसाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले आहेत.
ग्रामीण भागात बैठी घरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक घरांना पत्रे बसवण्यात आले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात प्रशासन खबरदारी घेत असते. पण अचानक आलेल्या वादळाच्या तडाख्याने मोठे नुकसान होऊ लागले आहे. मुळशीतही खाम्बोली गावात अंगणवाडीचे पत्रे उडून गेले आहेत. तर गावात विद्युत तारा तुटल्या आहेत.
आयुष प्रसाद म्हणाले, ग्रामीण भागातून वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून जाण्याच्या काल काही घटना घडल्या होत्या आम्ही गावातील सरपंच यांना आधीच खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पत्रे उडून जाऊ नये म्हणून त्यावर जड वस्तू ठेवावी असे काही पर्यायही सुचवले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा करण्यात येणार आहे. तसेच त्यांना मदतही केली जाणार आहे. अजून काळ गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्या चक्रीवादळाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.