दहावीचा निकाल लागणार; अकरावी प्रवेशाचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:13+5:302021-07-16T04:10:13+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (दि. १६) इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होणार ...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (दि. १६) इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होणार असला तरी अकरावी प्रवेशाचे काय? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे सीईटी प्रवेशाची तारीख केव्हा जाहीर होणार? या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे प्रसिद्ध केला जाणार आहे. परंतु, या निकालाच्या आधारे इयत्ता अकरावीत प्रवेश देणे सयुक्तिक नसल्याने राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले. तसेच सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रथम प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल आणि त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
सीईटी परीक्षा राज्य मंडळाकडून घेतली जाणार आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांवरील प्रश्न सीईटीमध्ये विचारले जात आहेत. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या अभ्यास साहित्याचा वापर करावा किंवा कोणती पुस्तके वापरावीत, याबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती नाही. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सीईटीसाठी प्रश्न संच उपलब्ध करून द्यावेत का? याबाबत सर्वेक्षण घेण्यात आले. त्यास बहुतांश विद्यार्थ्यांनी होकार दिला आहे. परंतु, विद्यार्थ्यांना प्रश्नसंच केव्हा मिळणार याबाबत संभ्रम आहे.
------------------------------------