निकाल जाहीर झाला; पण पाहताच आला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:43+5:302021-07-17T04:10:43+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. तसेच इयता नववी व दहावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे दहावीचा अंतिम निकाल ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. तसेच इयता नववी व दहावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे दहावीचा अंतिम निकाल तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. परीक्षा न घेता निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाची उत्सुकता होती. शुक्रवारी दुपारी १ वाजल्यापासून सर्वांनीच राज्य मंडळाच्या संकेतस्थळाला एकाचवेळी भेट दिली. विद्यार्थ्यांसह त्यांच्या नातेवाईकांनीही निकाल पाहण्याचा प्रयत्न केला. परिणामी संकेतस्थळावर ताण आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालच पाहता आला नाही. परिणामी अनेक पालक व विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
------------------------
निकालाच्या सर्व्हरवर ताण आल्याने तो क्रॅश झाला. मात्र, मुख्य संकेतस्थळांसह आणखी दोन लिंक वर दहावीचा निकाल उपलब्ध करून दिला आहे. सायंकाळपर्यंत ६० हजाराहून विद्यार्थ्यांनी निकाल डाऊनलोड केला. उर्वरित विद्यार्थ्यांना लवकरच निकाल पाहता येईल.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य
------------------
राज्य मंडळाचे नियोजन चुकलेच
दरवर्षी ऑनलाईन निकाल डाऊनलोड करण्यासाठी एमकेसीएलसह इतर तीन ते चार संकेतस्थळ उपलब्ध करून दिले जातात. तसेच मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातूनसुद्धा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची संधी दिली जाते. मात्र, यंदा निकाल पाहण्यास केवळ एकच संकेतस्थळ देण्यात आले होते. राज्य मंडळाने याबाबत आवश्यक काळजी घेणे अपेक्षित होते. इतर शिक्षण मंडळांच्या तुलनेत राज्य मंडळाने निकाल लवकर जाहीर केला असला तरी राज्य मंडळाचे आॅनलाईन निकालाचे नियोजन चुकले, अशी चर्चा केली जात आहे.
------------------------------
दोषींवर कारवाई होणार?
काही तांत्रिक बाबींमुळे शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल प्राप्त होण्यास अडथळे निर्माण झाले. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिली.