जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतींचा आज निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:48+5:302021-01-18T04:10:48+5:30
डाॅ. राजेश देशमुख : विजयी मिरवणुका, रॅली काढण्यास बंदी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणीला ...
डाॅ. राजेश देशमुख : विजयी मिरवणुका, रॅली काढण्यास बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणीला सोमवार (दि.१८) रोजी सकाळी १० वाजता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींच्या संख्येनुसार प्रत्येक तालुक्यात मतमोजणीसाठी टेबल व कर्मचारी नियुक्त केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात ३१२ टेबलवर १ हजार ३१९ कर्मचारी हे मतमोजणीचे काम करणार असून, दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी ९५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले. जिल्ह्यात तब्बल ११ लाख १६ हजार ५३७ मतदारांनी (८०.४२)टक्के मतदान करून ११ हजार ७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले आहे. कोरोना आणि लाॅकडाऊननंतर होत असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच मोठ्या प्रमाणात तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने प्रस्थापितांविरुद्ध तरुणामुळे निवडणुका चुरशीच्या ठरल्या आहेत. यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणी करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.
-------
जिल्ह्यातील तालुकानिहाय मतमोजणीची तयारी
तालुका ग्रामपंचायती टेबल कर्मचारी
वेल्हा 20 16 60
भोर 63 30 70
दौंड 49 28 84
पुरंदर 55 22 90
इंदापूर 57 37 120
बारामती 49 15 100
जुन्नर 59 30 90
आंबेगाव 25 25 85
खेड 80 32 150
शिरुर 62 14 100
मावळ 49 32 100
मुळशी 36 14 150
हवेली 45 17 120
एकूण 649 312 1319
------------
मतमोजणीनतर विजयी मिरवणुका, रॅली काढण्यास बंदी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी मिरवणुका, रॅली काढण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
जिल्ह्यात ६४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल
सोमवारी (दि.१८) लागणार आहे. या निकालाच्या या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले आहेत. सोमवारी पहाटेपासून रात्री बारापर्यंत संपूर्ण दिवसात विजयी मिरवणूक काढणे, रॅली काढणे, गुलाल उधळणे, विनापरवानगी फ्लेक्स अथवा बॅनर लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
तर सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी सकाळी सहापर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी, चायनीज, पानटपरी या सेवा बंद राहतील, असेदेखील आदेशात स्पष्ट केले आहे.