अंतर्गत गुणांअभावी रखडले ९३ विद्यार्थ्यांचे निकाल
By admin | Published: August 13, 2016 05:19 AM2016-08-13T05:19:12+5:302016-08-13T05:19:12+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ४२ महाविद्यालयांनी ९३ विद्यार्थ्यांचे विविध विषयांचे अंतर्गत गुण परीक्षा विभागाकडे न पाठविल्याने त्यांचे निकाल रखडल्याचे समोर आले
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ४२ महाविद्यालयांनी ९३ विद्यार्थ्यांचे विविध विषयांचे अंतर्गत गुण परीक्षा विभागाकडे न पाठविल्याने त्यांचे निकाल रखडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाविद्यालयांच्या चुकीमुळे संंबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत एप्रिल-मे २०१५ मध्ये विविध विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात आल्या. उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरू असताना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण परीक्षा विभागाकडे पाठविणे अपेक्षित असते. त्यानुसार लेखी परीक्षा व अंतर्गत गुण एकत्रित करून निकाल जाहीर केला जातो. परीक्षा विभागाने बहुतेक विद्याशाखांचे निकाल जाहीर केले आहेत. मात्र शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, कला व विज्ञान विद्याशाखांमधील ९३ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता ४२ वरिष्ठ महाविद्यालयांनी त्यांचे अंतर्गत गुण विद्यापीठाकडे पाठविले नसल्याचे उघडकीस आले. ही बाब समोर आल्यानंतर परीक्षा विभागात बैठक घेऊन संबंधित महाविद्यालयांना दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.