क्रॉस व्होटिंगचा होणार परिणाम
By admin | Published: August 5, 2015 03:28 AM2015-08-05T03:28:11+5:302015-08-05T03:28:11+5:30
दौंड तालुक्यात ठिकठिकाणी पॅनलव्यतिरिक्त सोईनुसार हातमिळवणी केल्यामुळे कुठल्याही एका पॅनलला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दौंड : दौंड तालुक्यात ठिकठिकाणी पॅनलव्यतिरिक्त सोईनुसार हातमिळवणी केल्यामुळे कुठल्याही एका पॅनलला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, स्थानिक गावपातळीवर ही निवडणूक असल्यामुळे मतदारांनीही सोईनुसार मतदान करून मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाले. त्यामुळे अपक्ष आणि बंडखोर उमेदवार यांची चांगलीच चलती राहील, असे ठिकठिकाणी मतदान केंद्राच्या परिसरात बोलले जात होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सरपंचपदासाठी अपक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागतील, असे झालेल्या मतदानावरून स्पष्ट होत आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाली. साधारणत: ११ वाजेपर्यंत १० टक्क्यांच्या जवळपास काही ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. त्यानंतर साधारणत: दुपारी २ नंतर मतदारांचा ओघ वाढला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. लिंगाळी ग्रामपंचायतीच्या दौंड येथील तुकडोजी हायस्कूल येथील मतदान केंद्र १२ वाजेपर्यंत ओस पडलेले होते. त्यामुळे निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना जांभया देण्याशिवाय पर्याय नव्हता.
काही मतदान केंद्रावर १०० वयाच्या वृद्ध महिलांनी मतदान केले. विशेषत: पाटस, वडगावदरेकर या मतदान केंद्रांवर ही परिस्थिती होती.