इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा निकाल अखेर बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:40 AM2018-07-15T00:40:00+5:302018-07-15T00:40:03+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आभियांत्रिकी शाखेच्या सर्व वर्षांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन २०१५च्या पॅटर्ननुसार करण्याचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आभियांत्रिकी शाखेच्या सर्व वर्षांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन २०१५च्या पॅटर्ननुसार करण्याचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एटीकेटीची संधी उपलब्ध होऊन वर्ष वाचणार आहे. मात्र, निकाल २०१५च्या पॅटर्ननुसार लावण्यात आला, तरी गुणपत्रके मात्र टक्केवारीनुसारच देण्यात येतील.
आभियांत्रिकी परीक्षांचा निकाल जुन्या पॅटर्ननुसार लावण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना पसरली होती. याविरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी परीक्षा विभागाच्या संचालकांकडे धाव घेऊन हा निकाल बदलण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठ अधिकार मंडळाची बैठक शनिवारी झाली. तिन्ही पॅटर्नच्या विद्यार्थ्यांची एकच शिक्षण घेतले, तसेच त्यांनी सारखीच परीक्षा दिली. त्यामुळे त्यांचे मूल्यमापन व निकालही एकाच पद्धतीने लावला जावा, असे मत सदस्यांनी मांडले. त्यानुसार २००८ व २०१२ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे निकाल २०१५ पॅटर्ननुसार तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
।टक्केवारीत निकाल
आभियांत्रिकीच्या २००८ व २०१२ या पॅटर्नच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या सेमिस्टरचा निकाल २०१५ पॅटर्ननुसार जाहीर करण्यात आला. मात्र, दुसऱ्या सेमिस्टरचा निकाल टक्केवारीत जाहीर केल्याने अनुत्तीर्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. अधिकार मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता मूल्यमापन व निकाल २०१५ नुसार होईल, तसेच गुणपत्रके टक्केवारीत दिले जाणार आहेत.