प्रथम वर्षाचा निकाल विद्यापीठानेच तयार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:05+5:302021-05-21T04:11:05+5:30
विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयांची संख्या सुमारे १ हजार आहे. त्यामुळे प्रथम, द्वितीय व तृतीय ...
विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयांची संख्या सुमारे १ हजार आहे. त्यामुळे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अनेक अडचणी येत होत्या. परिणामी २००८-०९ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने महाविद्यालयांनीच प्रथम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन करून निकाल जाहीर करावा, असा निर्णय घेतला. परंतु, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासह पदवी अभ्यासक्रमासाठी सुद्धा चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम पॅटर्न लागू करण्यात आला. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या निकालावर तीनही वर्षांच्या परीक्षेच्या गुणांचा उल्लेख असावा, असा निर्णय न्यायालयाने दिला.
संलग्न महाविद्यालयांकडे चॉइस बेस्ट क्रेडिट सिस्टिमनुसार पदवी अभ्यासक्रमाचा निकाल तयार करण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली. गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाकडून प्रथम वर्षाचा निकाल तयार करून तो महाविद्यालयांकडे पाठविला जात होता. परंतु, विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत प्रथम वर्षाच्या परीक्षांचा निकाल तयार करण्याचे काम महाविद्यालयांकडे द्यावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-------------
अद्याप कोणतेही प्रशिक्षण नाही दिले
महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिमनुसार निकाल तयार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण अद्याप दिले गेले नाही. विद्यापीठाने अचानक निर्णय जाहीर केल्यामुळे महाविद्यालयांना सुद्धा याबाबत तयारी करण्यास वेळ मिळाला नाही. निकाल जाहीर करताना काही त्रुटी किंवा चुका राहिल्या तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने पूर्वीप्रमाणे निकाल तयार करून विद्यापीठाकडे पाठवावा, अशी विनंती प्राचार्य महासंघातर्फे निवेदनाद्वारे विद्यापीठाला करण्यात आली आहे.