पिंपरी, चिंचवडचा निकाल उशिरा लागणार
By admin | Published: October 17, 2014 12:19 AM2014-10-17T00:19:00+5:302014-10-17T00:19:00+5:30
मतदानानंतर प्रशासन आता रविवारी (दि. 19) होत असलेल्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार
Next
पिंपरी : मतदानानंतर प्रशासन आता रविवारी (दि. 19) होत असलेल्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार असून, जिल्ह्यातील 21 मतदारसंघाचे चित्र दुपारपयर्ंत स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
उमेदवार संख्येवरुन मोजणीसाठी किती वेळ लागेल याचा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. मोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात 21 टेबल असून एक टेबल टपाली मतदानाच्या मोजणीसाठी असणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षकही लक्ष ठेवणार आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्याची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. फेरीनिहाय मतांची माहिती आयोगाला पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी यंदा एक फेरी पूर्ण झाल्यावरच दुसरी फेरी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रत्येक फेरीसाठी साधार वीस मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे.
भोर, आंबेगाव आणि मावळ या मतदारसंघात सर्वात कमी
मतदार असल्याने या ठिकाणचा निकाल लवकर लागण्याची
शक्यता आहे. तर इंदापूर, चिंचवड, पिंपरी, दौंड, शिवाजीनगर, वडगावशेरी या मतदारसंघात 18 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने या ठिकाणचा निकाल लागण्यास
उशीर होईल.(प्रतिनिधी)
मतमोजणी बालेवाडी, कोरेगाव पार्क येथे
पुणो शहरातील वडगाव शेरी, शिवाजीनगर, पुणो कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ, हडपसर आणि पर्वती या विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे. कोथरुड, खडकवासला, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या पाच विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी-म्हाळुंगे येथील क्रीडा संकुलात, तर ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. जिल्ह्यातील मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांसह एसआरपीएफचे जवानही तैनात असतील.