किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत

By admin | Published: February 22, 2017 02:21 AM2017-02-22T02:21:45+5:302017-02-22T02:21:45+5:30

हवेली तालुक्यातील १३ जिल्हा परिषद गट व २६ पंचायत समिती गणांत किरकोळ बाचाबाचीचे अपवाद

Retail peaceful, with the exception of | किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत

किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत

Next

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील १३ जिल्हा परिषद गट व २६ पंचायत समिती गणांत किरकोळ बाचाबाचीचे अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. हवेलीतील एकूण ५८ टक्के मतदान झाल्याची माहिती हवेलीचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.
या वेळी प्रचारासाठी उमेदवारांना फक्त सहा दिवस मिळाल्याने त्यांना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. या सहा दिवसांतील प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने उत्तरोत्तर रंगतदार होत गेलेल्या या निवडणूक प्रक्रियेत आज मतदारराजाने आपले अमूल्य मत आज मतदान यंत्रात बंद केले. निवडणूक आयोगाने मतदान स्लिपा वाटण्याचे काम दिलेल्यांनी त्या बहुसंख्य ठिकाणी त्या वितरीत न केल्याने अनेक मतदार आपले मतदान कोठे आहे? याची विचारणा करताना दिसत होते. प्रत्येक पक्षाचे बुथवरील कार्यकर्ते मोबाईल अ‍ॅपवरून त्यांचा मतदार यादी व मतदान क्रमांक लिहून देत असताना दिसत होते. अनेकांची नावे मतदार यादीत नसणे, तसेच मतदान दुसऱ्या गणात असणे, असे प्रकार झाल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे आपले हक्काचे मतदार मतदान करू शकले नाहीत, याची रूखरूख अनेक उमेदवारांनी बोलून दाखवली.जास्तीत जास्त मतदान आपल्यालाच मिळावे, म्हणून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्व पक्षासह अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळपासूनच धावपळ करत होते. यांसाठी खाजगी गाड्यांचा वापर करण्यात आला. कायम उपेक्षीत असलेले अपंग व वृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी चढाओढ लागली होती. बहुतांश ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढती होत आहेत. (वार्ताहर)

नवतरुण मतदारांची संख्या वाढली
लोणीकंद : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पेरणे-वाडेबोल्हाई गटामध्ये मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. विशेषत: नव्याने मतदान करीत असलेल्या तरुणांमध्ये प्रचंड उत्साह होता.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांचा हा बालेकिल्ला. त्यांचे खंदे समर्थक सुभाष जगताप यांच्या पत्नी सौ. कल्पना सुभाष जगताप यांना रिंगणात उतरवले, तर विरोधी आघाडीवर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप भोंडवे यांच्या पत्नी जयश्री संदीप भोंडवे यांच्या उमेदवारीने सर्व पक्षातील विरोधक एकवटले आहेत. या चुरशीच्या लढतीची उत्सुकता मतदानापर्यंत दिसून येत होती.
लोणीकंद केंद्रावर सकाळी ७.३० वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी मतदान केले. ३७७ नंबरच्या बूथवर सकाळी ९.३० वाजता ७.८४ टक्के मतदान झाले, तर १०.३० वाजता ४८०० मतांपैकी ८९१ मतदान झाले. केसनंद येथे सकाळी ७ वाजता कामगारवर्गाने गर्दी केली होती. दुपारी काही काळ सोडता दिवसभर रांगा होत्या. सकाळी १०.३० पर्यंत १२.१४ टक्के मतदान झाले,अशीच परिस्थिती बकोरी, पेरणे, डोंगरगाव, बुरकेगाव, फुलगाव, वढू, तुळापूर या गावांमध्ये होती.

हवेलीत ३० संवेदनशील केंद्रे

४जिल्ह्यातील सर्वांत जास्त ३० संवेदनशील मतदान केंद्रे हवेली तालुक्यात असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने १ उपविभागीय पोलीस अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक, १६ सहायक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, २८७ पोलीस कर्मचारी, १४० होमगार्ड यांच्यासमवेत प्रत्येकी एक जलद प्रतिकार पथक व एसआरपीएफचे प्लाटून असा बंदोबस्त लावण्यात आल्याने कसलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.

Web Title: Retail peaceful, with the exception of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.