‘परमेश्वराला रिटायर करा’; आजही ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 02:18 AM2018-11-16T02:18:44+5:302018-11-16T02:19:24+5:30
डॉ. श्रीराम लागू : वयाच्या ९२ व्या वर्षात पदार्पण करताना वैचारिक कणखरता
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : ‘परमेश्वराला रिटायर करा’ या माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे. ते विधान मागे घेण्याचे काहीच कारण नाही. परमेश्वर हा केवळ माणसाच्या डोक्यात चाललेला विचार आहे, असे मला वाटते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या म्हणजे समाजाच्या सध्याच्या अवनत अवस्थेवर पडलेला प्रकाशझोत आहे, असे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डॉ. लागू यांचा शुक्रवारी ९१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने ‘लोकमत’शी संवाद साधताना नाटक, चित्रपट क्षेत्रात केलेली मुशाफिरी, कला क्षेत्रातील राजकारणाच्या हस्तक्षेपाला असलेला ठाम विरोध, ‘मी नास्तिक आहे’ अशी खंबीर भूमिका, असे नानाविध कंगोरे उलगडले. वयाच्या ९२ व्या वर्षात पदार्पण करत असताना स्वत:कडेच तटस्थतेने पाहण्याच्या त्यांच्या विलक्षण दृष्टिची प्रचिती आली. ‘मला हॅम्लेटची भूमिका करायला नक्की आवडली असती’, असे सांगताना डॉ. लागू यांच्या चेहऱ्यावरील आविर्भावाने त्यांच्यातील अभिनेता अद्यापही जागा असल्याची साक्ष दिली. डॉ. लागू म्हणाले, ‘‘कलाकृतीला विरोध करण्याचे झुंडशाहीचे वातावरण पूर्वी होते आणि आजही तसेच आहे. ही झुंडशाही नव्हे तर विशिष्ट व्यक्तींचे मूळ रूपच आहे. समाजाला हा कायम त्रास देणारा हा विषय आहे. एखादी कलाकृती आवडली नाही, तर त्याविरोधात मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, विरोध म्हणून नाटक, सिनेमा बंद पाडणे, धमकी देणे हा प्रकार अजिबात क्षम्य नाही. त्याचे कधीही समर्थन करता येणार नाही. तू धमकी देतोस, म्हणजे स्वत:ला कोण समजतोस? अशी गुंडगिरी चालवूनच घेतली जाणार नाही.
राजकारणाचा कला क्षेत्रातील हस्तक्षेप मला कधीच मान्य नव्हता. याला मी सुरुवातीपासूनच विरोध करत आलो आहे. आम्ही चुकत असूही, त्यातून सुधारणा करु. मात्र, राजकारणाने अजिबात हस्तक्षेप करता कामा नये, असेही डॉ. लागू यांनी ठामपणे सांगितले. - मला कायमच अवघड भूमिकांनी भूरळ घातली. अनेक भूमिका करायच्या राहून गेल्या, असे वाटते. त्यातही मला ‘हॅम्लेट’ची भूमिका साकारायला नक्कीच आवडली असती, असेही ते म्हणाले.
डॉ. काशिनाथ घाणेकरांशी वैर कधीच नव्हते
च्सध्या गाजत असलेल्या ‘...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटामध्ये डॉ. श्रीराम लागू हे महत्त्वाचे पात्र आहे. डॉ. घाणेकर आणि डॉ. लागू यांच्यातील संघर्ष अगदी वैराच्या पातळीवर जाऊन दोघांचे रंगभूमीवरील युद्ध चितारले आहे. डॉ. लागू यांनीही आवर्जून हा चित्रपट पाहिला आहे.
च्याबाबत ते म्हणाले, ‘‘माझे आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे कधीच वैर नव्हते; आम्ही मित्र होतो. मात्र, आम्हाला एकमेकांची मते पटत होती, असे नाही. न पटलेल्या गोष्टी आम्ही एकमेकांना सांगायचो. आमची अभिनयाची शैलीच वेगवेगळी होती. दोघांनी एकमेकांची अनेक नाटके पाहिली आणि त्यावर चर्चाही केली.’’
प्रेक्षकांनी नैसर्गिक अभिनय स्वीकारला याला मी निमित्तमात्र
1प्रेक्षक नेहमी प्रगल्भ असतोच. काशिनाथ घाणेकर यांचा स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग होता. प्रेक्षकांनी त्यांच्यावर कमालीचे प्रेम केले. नैसर्गिक अभिनय आणि प्रेक्षकांच्या आहारी जाऊन केलेला अभिनय असे दोन प्रकार असतात.
2सुरुवातीला प्रेक्षकांना भडक अभिनय हवा होता; पण, काही काळाने रसिकांनी नैसर्गिक अभिनयाला आपलेसे केले आणि भडक अभिनयाकडे पाठ फिरवली. या बदलाला मी
केवळ निमित्तमात्र ठरलो, अशी भावना डॉ. श्रीराम लागू यांनी
व्यक्त केली.