‘परमेश्वराला रिटायर करा’वर अखेरपर्यंत ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:03 AM2019-12-18T05:03:44+5:302019-12-18T05:04:01+5:30
डॉ. श्रीराम लागू : वयाच्या ९२व्या वर्षात पदार्पण करताना वैचारिक कणखरता
प्रज्ञा केळकर-सिंग ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘परमेश्वराला रिटायर करा’ या माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे. ते विधान मागे घेण्याचे काहीच कारण नाही. परमेश्वर हा केवळ माणसाच्या डोक्यात चाललेला विचार आहे, असे मला वाटते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या म्हणजे समाजाच्या सध्याच्या अवनत अवस्थेवर पडलेला प्रकाशझोत आहे, असे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डॉ. लागू यांचा शुक्रवारी ९१वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’शी संवाद साधताना नाटक, चित्रपटक्षेत्रात केलेली मुशाफिरी, कलाक्षेत्रातील राजकारणाच्या हस्तक्षेपाला असलेला ठाम विरोध, ‘मी नास्तिक आहे’ अशी खंबीर भूमिका, असे नानाविध कंगोरे उलगडले. वयाच्या ९२व्या वर्षात पदार्पण करत असताना स्वत:कडेच तटस्थतेने पाहण्याच्या त्यांच्या विलक्षण दृष्टीची प्रचीती आली. ‘मला हॅम्लेटची भूमिका करायला नक्की आवडली असती,’ असे सांगताना डॉ. लागू यांच्या चेहऱ्यावरील आविर्भावाने त्यांच्यातील अभिनेता अद्यापही जागा असल्याची साक्ष दिली. डॉ. लागू म्हणाले, ‘‘कलाकृतीला विरोध करण्याचे झुंडशाहीचे वातावरण पूर्वी होते आणि आजही तसेच आहे. ही झुंडशाही नव्हे, तर विशिष्ट व्यक्तींचे मूळ रूपच आहे. समाजाला हा कायम त्रास देणारा हा विषय आहे. एखादी कलाकृती आवडली नाही, तर त्याविरोधात मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, विरोध म्हणून नाटक, सिनेमा बंद पाडणे, धमकी देणे हा प्रकार अजिबात क्षम्य नाही. त्याचे कधीही समर्थन करता येणार नाही. तू धमकी देतोस, म्हणजे स्वत:ला कोण समजतोस? अशी गुंडगिरी चालवूनच घेतली जाणार नाही. राजकारणाचा कलाक्षेत्रातील हस्तक्षेप मला कधीच मान्य नव्हता.
याला मी सुरुवातीपासूनच विरोध करत आलो आहे. आम्ही चुकत असूही, त्यातून सुधारणा करू. मात्र, राजकारणाने अजिबात हस्तक्षेप करता कामा नये, असेही डॉ. लागू यांनी ठामपणे सांगितले. ‘मला कायमच अवघड भूमिकांनी भूरळ घातली. अनेक भूमिका करायच्या राहून गेल्या, असे वाटते. त्यातही मला ‘हॅम्लेट’ची भूमिका साकारायला नक्कीच आवडली असती,’ असेही ते म्हणाले.
प्रेक्षकांनी नैसर्गिक
अभिनय स्वीकारला
याला मी निमित्तमात्र
प्रेक्षक नेहमी प्रगल्भ असतोच. काशिनाथ घाणेकर यांचा स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग होता. प्रेक्षकांनी त्यांच्यावर कमालीचे प्रेम केले. नैसर्गिक अभिनय आणि प्रेक्षकांच्या आहारी जाऊन केलेला अभिनय असे दोन प्रकार असतात. सुरुवातीला प्रेक्षकांना भडक अभिनय हवा होता; पण काही काळाने रसिकांनी नैसर्गिक अभिनयाला आपलेसे केले आणि भडक अभिनयाकडे पाठ फिरवली.
या बदलाला मी केवळ निमित्तमात्र ठरलो, अशी भावना डॉ. श्रीराम लागू
यांनी व्यक्त केली.
(पूर्वप्रसिद्धी : १६ नोव्हेंबर २0१८)