निवृत्त एसीपी भानुप्रताप बर्गे शिवाजीनगरमधून लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:51 PM2019-10-01T14:51:32+5:302019-10-01T14:59:51+5:30
पुण्यात एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे इतके बॅनर लागण्याची ही पहिलीच वेळ होती़. तेव्हाच ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सुचित होत होते़....
पुणे : शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर शिवसेनेकडून निवडणुक लढविण्याच्या तयारीत असलेले निवृत्त सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे़. भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे़.
दोन महिन्यांपूर्वी पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर भानुप्रताप बर्गे यांच्या वाढदिवसांनिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे अनेक बॅनर शहरात ठिकठिकाणी लागले होते़. पुण्यात एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे इतके बॅनर लागण्याची ही पहिलीच वेळ होती़. तेव्हाच ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सुचित होत होते़.
३१ जुलै रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी भानुप्रताप बर्गे यांनी अन्य काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती़. त्यामुळे पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती़. मात्र, आज भाजपाच्या उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली़. त्यात सिद्धार्थ शिरोळे यांना तिकीट देण्यात आले आहे़.
त्यानंतर भाजपाच्या सन्मान हॉटेल येथील कार्यालयासमोर अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन घराणेशाहीला विरोध केला आहे़. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते़.
भानुप्रताप बर्गे यांनी पुणे शहर पोलीस दलात अनेक वर्षे काम केले आहे़. तसेच दहशतवाद विरोधी पथकात काम करीत असताना त्यांनी शाळा, महाविद्यालये, तसेच विविध संस्थांशी संपर्क साधत दहशतवाद विरोधात जनजागृती करुन लोकसंग्रह केला आहे़ त्यामुळे सर्व समाजातील तरुणवर्ग त्यांच्याशी जोडला गेलेला आहे़.
उमेदवारी अर्ज आताच घेतला असल्याचे सांगून आपण निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहे़. सर्वांशी बोलून ठरविणार असल्याचे भानूप्रतास बर्गे यांनी सांगितले़.