निवृत्तीदिनीच सायकलवरून कॅन्सर जनजागृती! सेवानिवृत्त सैनिकाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:38 AM2018-12-28T00:38:39+5:302018-12-28T00:38:54+5:30
आईचा कॅन्सरने झालेला मृत्यू पाहून भारतीय सैन्यदलातील गजानन काळे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच ओडिशा ते पुणे सायकलवरून कॅन्सर या रोगाच्या बाबतीत जनजागृती मोहीम करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.
कुरकुंभ : आईचा कॅन्सरने झालेला मृत्यू पाहून भारतीय सैन्यदलातील गजानन काळे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच ओडिशा ते पुणे सायकलवरून कॅन्सर या रोगाच्या बाबतीत जनजागृती मोहीम करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. मोहिमेत त्यांच्याबरोबर दिल्ली येथील ग्रामीण स्नेह फाउंडेशन या कॅन्सरवर काम करणाऱ्या संस्थेने सहभाग नोंदविला.
कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गजानन काळे यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधिकारी राजेश पाखरे, सरपंच राहुल भोसले, कॅन्सरबाबत जनजागृती करणारे नौशाद आलम, कुमार अमन, उज्ज्वल कुमार, आशा वर्कर व इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. गजानन काळे यांनी आपल्या मनोगतात २०१३मध्ये त्यांच्या आईला झालेल्या कॅन्सरबाबत माहिती सांगितली. कॅन्सरपासून कशा प्रकारे बचाव केला पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केले. आईच्या मृत्यूने काळे यांना समाजात याबाबत जनजागृती करण्याची प्रेरणा मिळाली व सेवानिवृत्त होतानाच त्यांनी ओडिशा येथून सायकलवर जनजागृतीसाठी प्रवास सुरू केला.
एरवी सेवानिवृत्त होऊन घरी परतण्याची मानसिकता ठेवून सैनिक निघालेला असतो; मात्र गजानन काळे हे त्याला अपवाद आहेत. समाजात कॅन्सरचा प्रसार थांबविण्यासाठी पुढेही अशा प्रकारच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्धार या वेळी त्यांनी व्यक्त केला आहे. गजानन काळे हे माहूर (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील रहिवासी आहेत. भारतीय सैन्यदलात लुधियाना येथे एअर डिफेन्समध्ये हवालदार या पदावर ते कार्यरत होते. दि. ३० नोव्हेंबर रोजी सेवेची १६ वर्षे पूर्ण करून काळे यांनी दोन डिसेंबरला हा प्रवास बºहाणपूर येथून सुरू केला. जवळपास पंधराशे किलोमीटर अंतर पार करीत २३ दिवसांच्या प्रवासानंतर पुणे येथे जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत त्याची सांगता झाली. प्रवासादरम्यान पाच राज्यांतून १३ जिल्हे व त्यातील अनेक गावांत त्यांनी जनजागृती केली. कॅन्सरसारख्या असाध्य रोगावर इतरांना वेळीच माहिती देऊन किंवा त्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगता कार्यक्रमात सांगितले.
समाजात अनेक जण कॅन्सरच्या विळख्यात येत आहेत. जनजागृती हाच याबाबत एक उत्तम पर्याय असून, ती काही प्रमाणात करता आल्याचे समाधान आहे. या प्रवासात ज्यांनी-ज्यांनी मदत केली त्या सर्वांचेदेखील योगदान आहे. यापुढे याबाबत काम करणार आहे.
-गजानन भाऊ काळे, माजी सैिनक