राजकारणाचा स्तर उंचावण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांनी राजकारणात यावे - डॉ.शां.ब. मुजुमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:27 PM2022-12-08T20:27:27+5:302022-12-08T20:27:35+5:30
लष्कराला शिस्त, देशप्रेम, देशाप्रती आदर असल्याने ते राजकारणाचा स्तर नक्कीच उंचावतील
पुणे : आजच्या राजकारणात ऐकू येणारी शिवराळ भाषा, भ्रष्टाचाराचा वाढता आलेख यामुळे सर्वसामान्य माणूस देखील त्रस्त झाला आहे. त्यातच गुरूवारी पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशनावेळी सिंम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष आणि कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी देखील राजकारणात अलीकडे अनुभवायला येणारी शिवराळ भाषा, वाढता भ्रष्टाचार आणि बेशिस्त अवगूण पाहता राजकारणाचा स्तर उंचावण्यासाठी आणि सुधारण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांनी राजकारणात यावे असे मत व्यक्त केले. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले आणि त्यांच्या पत्नी मेघना भूषण गोखले यांनी लिहिलेल्या ‘आकाशझेप’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.
मुजुमदार पुढे म्हणाले की, अमेरिकेत देखील लोकशाहीचा स्तर प्रचंड खालावला होता. त्यावेळी आता पुरे झाले या भावनेतून पेटून उठून तेथील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावरील राजकारणापासून प्रवेश करुन राजकारणातील सर्व घाण साफ केली. आधी शहर स्वच्छ करत त्यांनी देश पातळीपर्यंत मजल मारली. लष्करातून निवृत्त होऊन केवळ निवृत्तीचे आयुष्य जगायचे आणि मला काय त्याचे अशी सर्वसामान्य नागरिकांसारखी भूमिका निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांना घेता येणार नाही, तर राजकारणात सक्रिय उतरुन नियोजनपूर्वक निवडणूक लढवून जिंकूनही यावे लागेल. लष्कराला शिस्त, देशप्रेम, देशाप्रती आदर असल्याने ते राजकारणाचा स्तर नक्कीच उंचावतील. आज निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्याचाच आदर्श ठेऊन इतर लष्करी अधिकाऱ्यांनी राजकारणात यावे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी, मी भुगोल विषयाचा अभ्यास करत असताना मला भारताच्या सीमावर्ती भागात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा लष्कराच्या सहकार्यामुळे मी माझे संशोधन पूर्ण करु शकलो. त्यावेळी त्यांच्या सोबत राहण्याचा योग आला आणि त्या निमित्ताने त्यांच्यातील शिस्तीचा देखील प्रत्यय आला, असे सांगितले.