Pune: निवृत्त कर्नलला टास्क फ्रॉडमध्ये अडीच कोटीला गंडा; देशभरात टास्क फ्रॉडचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 10:40 AM2023-06-08T10:40:01+5:302023-06-08T10:40:27+5:30
गेल्या दोन महिन्यांमध्ये संपूर्ण देशभर अशा प्रकारे पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली सायबर चोरटे लोकांना जाळ्यात ओढून फसवणूक करत आहेत...
पुणे : दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याच्या नावाखाली पैसे गुंतविण्यास सांगून सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त कर्नलला तब्बल अडीच कोटी रुपयांना गंडा घातला. गेल्या २ महिन्यात अशा प्रकारे किमान ६६ तक्रारी आल्या असून, त्यात तब्बल २० कोटी रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये संपूर्ण देशभर अशा प्रकारे पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली सायबर चोरटे लोकांना जाळ्यात ओढून फसवणूक करत आहेत.
याबाबत एका ७१ वर्षांच्या कर्नलने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांना व्हॉट्सॲपवर ऑनलाइन रिव्ह्यू लिहिण्यापासून तसेच व्हिडीओला लाइक करून जादा परतावा मिळविण्याचा मेसेज आला होता. सुरुवातीला त्यांच्या खात्यात काही पैसे जमा झाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांच्याशी चॅटिंग सुरू केले. त्यांना प्री-पेड टास्क स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. कर्नल यांनी चोरट्यांच्या सांगण्याप्रमाणे १८ खात्यात ४८ व्यवहारांद्वारे ते पैसे भरत गेले. आपली फसवणूक होतेय, हे लक्षात येईपर्यंत त्यांची सर्व बचत आणि सेवानिवृत्तीची जमा असलेली रक्कम गेली होती.
याबाबत सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल पाटील यांनी सांगितले की, एप्रिल आणि मे महिन्यात हा सर्व प्रकार झाला असून, त्यांनी घरच्यांना याबाबत काहीही सांगितले नाही. त्यांची तक्रार येताच बँकांना संबंधित खात्यातील पैसे गोठविण्यास सांगण्यात आले आहे.
पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली टास्क फ्रॉडचा हा प्रकार गेल्या २-३ महिन्यात वाढीस लागला असून, अनेकांनी जादा परतावा मिळण्यासाठी नातेवाइकांकडून पैसे घेऊन त्यात रकमा गुंतविल्या आहेत. चंदननगर पोलिस ठाण्यात सोमवारी एकाच दिवशी १० जणांची ५० लाखांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच बुधवारी आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यात गेल्या २ महिन्यात टास्क फ्रॉडच्या तब्बल ६६ तक्रारी आल्या आहेत. त्यात कोट्यवधींची फसवणूक झाली आहे.
...हे लक्षात ठेवा
* कोणत्याही लिंक किंवा व्हिडीओ लाइक केल्या की पैसे मिळत नाहीत
* माशाला पकडण्यासाठी जसा गळ टाकला जातो, तसे सुरुवातीला तुमच्या खात्यात किरकोळ रक्कम टाकली जाते.
* त्यांनीच तयार केलेल्या खात्यात पैसे दिसत असले तरी ते कधीही खरे नसतात.
* एकदा गुंतवलेले पैसे आणखी पैसे गुंतविल्यास कधीच परत मिळत नाहीत.
* इझी मनीच्या नादी लागू नका.
* अशा मेसेजकडे दुर्लक्ष करणे, हाच यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग.
टास्क फ्रॉडच्या सायबर चोरट्यांकडून देशभरात अशा प्रकारे फसवणूक केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे प्रकार वाढले आहेत. सायबर पोलिस ठाण्यात गेल्या २ महिन्यात ४५ तक्रारी आल्या आहेत.
मीनल सुपे-पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.