मोदींच्या सभेदरम्यान सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा अपघात; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 03:17 PM2023-08-02T15:17:56+5:302023-08-02T15:18:34+5:30
डोक्याला मार लागल्याने पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले होते
पुणे : पुण्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा सुखरूप पार पडला. पुणेकरांनीहीपोलिसांना सहकार्य केल्याचे दिसून आले. या दरम्यान भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांचेही सहकार्य लाभले. अशातच शिवाजीनगर येथे झालेल्या अपघातात सेवानिवृत्त पोलीस गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी तत्परता दाखवून शिंदे गटाच्या सुधीर जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसाचे प्राण वाचवले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या पुणे मेट्रो उदघाटन सोहळ्याला वडगावशेरी मतदार संघातील भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचे उपाध्यक्ष, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे आले होते. ते कार्यक्रमस्थळी रस्ता ओलांडत असताना कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. त्याचवेळी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रमुख सुधीर जोशी आसनव्यवस्थेकडे जात होते, त्यांनी अपघात बघता क्षणी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत, विठ्ठल सुर्वे यांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या ठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने होते.
मात्र कर्तव्यावर नियुक्त असल्याने ते त्यांना मदत करण्यास असमर्थ होते. या संकटावर मात करत जोशी आणि त्यांच्या टिमने वेगाने हालचाली करत त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल केले. तज्ञ डॉक्टरांशी संपर्क करीत त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. सुर्वे यांच्या मेंदूला मार बसल्याने वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे यांचे प्राण वाचले. यावेळी आशुतोष शेंडगे, ऋषिकेश गोसावी, उपशहरप्रमुख सुधीर कुरूमकर यांनीही तातडीने मदत केली. सध्या त्यांच्यावर संचेती रूग्णालयात आयसीयू कक्षात उपचार सुरू असून, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि एकनाथ शिंदे सोशल फाउंडेशनतर्फे त्यांच्या उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.