मुद्देमालचा अपहार केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यातील २ निवृत्त पोलिसांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:42 PM2018-02-01T12:42:36+5:302018-02-01T12:44:49+5:30
सहकारनगर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल विभागात काम करताना लाखो रुपयांच्या मुद्देमालाचा अपहार करणाऱ्या दोघा निवृत्त सहायक फौजदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे : सहकारनगर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल विभागात काम करताना लाखो रुपयांच्या मुद्देमालाचा अपहार करणाऱ्या दोघा निवृत्त सहायक फौजदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
मनोहर गंगाराम नेतेकर (वय ६०, रा़ आंबाई अपार्टमेंट, धायरी) आणि जयवंत अमृत पाटील (वय ५९, रा़ भारत कॉलनी, कर्वेनगर) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांची सहकारी पोलीस हवालदार अलका गजानन इंगळे (वय ५२, रा़ महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, बिबवेवाडी) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ सहकारनगर पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून म्हणून नेमणूकीला असताना २००४ ते ३१आॅगस्ट २०१७ दरम्यान त्यांनी रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करुन न्यायालयाचा आदेश नसताना मुद्देमालाची परस्पर विल्हेवाट लावली़ तशा खोट्या नोंदी करुन खाडाखोड करुन बनावट दस्तावेज तयार केले़ त्याद्वारे ४ लाख ८ हजार ५०६ रुपये रोख, २२ मोबाईल, २३ वाहने, एक लॅपटॉप, २ इलेक्ट्रिक मीटर यांचा अपहार केला होता़ त्यांनी न्यायालयाचा आदेश नसताना परस्पर वाहनांचा लिलाव करुन त्यांची विक्री केली होती़ नेतेकर हे २०१६ मध्ये तर जयवंत पाटील हे ३१ आॅगस्ट २०१७ रोजी निवृत्त झाले होते़ अलका इंगळे यांची वाहतूक शाखेत बदली झाली आहे़ त्यानंतर ही जबाबदारी दुसऱ्या कर्मचाऱ्यांवर दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़
पोलिसांनी त्यांना अटक करुन त्यांच्याकडून १ लाख ४७ हजार रुपये हस्तगत केले आहेत़ न्यायालयाने अधिक तपासासाठी त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.