फोन आल्याचे सांगत निवृत्त पोलिसाच्या एटीएम कार्डची अदलाबदली; सव्वा लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 09:15 PM2021-06-23T21:15:51+5:302021-06-23T21:16:56+5:30
एटीएममधून १० हजार रुपये काढत असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. ते फोन उचलून बाजुला बोलत असताना कार्ड एटीएम मशीनमध्येच राहिले...
पुणे : फोन आल्याचे सांगत निवृत्त पोलिसाच्याएटीएम कार्डची अदलाबदली करुन तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वानवडी येथील जगताप चौकातील एटीएममध्ये हा प्रकार घडला.
निवृत्त पोलीस माधव धायगुडे (वय ६१, रा. एसीपी वास्तू, हडपसर) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मास्क घातलेल्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी धायगुडे आणि त्यांचा मुलगा जगताप चौकातील एटीएममधून पैसे काढण्यासाठी ७ जून रोजी गेले होते. एटीएममधून पैसे निघत नसल्याने त्यावेळी तेथे असलेल्या एका तरुणाने त्यांना आयडीबीआय बँकेच्या एटीएममधून पैसे निघतात असे सांगितले. तेथे त्यांची बाचाबाचीही झाली, त्यांनी त्या तरुणाला झापताना तू मला सांगू नको असा सज्जड दमही दिली. दरम्यान, धायगुडे आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असताना आरोपी त्यांच्यामागेच उभा होता. एटीएममधून १० हजार रुपये काढत असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. ते फोन उचलून बाजुला बोलत असताना कार्ड एटीएम मशीनमध्येच राहिले. याचाच फायदा घेत आरोपीने एटीएमकार्डची आदला बदली करून त्यांचे कार्ड चोरले. त्याच दिवशी चोरट्याने त्यांच्या एटीएममधून १ लाख ३० रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक जयवंत जाधव पुढील तपास करीत आहेत.