Pune Crime: पत्नीसह सासू, मेहुण्यांनी केलेल्या मारहाणीत निवृत्त सैनिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 11:32 AM2022-01-25T11:32:33+5:302022-01-25T11:39:32+5:30
पत्नीसह सासू आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल...
पुणे: पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नीसह सासू, मेहुण्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने निवृत्त सैनिकाचा मृत्यू झाला. विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोहगाव परिसरात 11 जानेवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पत्नीसह सासू आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद रघुनाथ जाधव (वय 39) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी ज्योती जाधव, सासु सुषमा दळवी, आणि मेहुणे राकेश दळवी, कैलास दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रमोद जाधव हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. लोहगाव परिसरात पत्नी आणि दोन मुलांसह ते राहत होते. प्रमोद जाधव यांना दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे मागील वर्षभरापासून पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती.
11 जानेवारी रोजी मुलांच्या शाळेसंदर्भातील काही कागदपत्र घेण्यासाठी ज्योती जाधव या लोहगाव येथील घरी आल्या होत्या. यावेळी पुन्हा पती-पत्नी भांडण झाले आणि प्रमोद जाधव यांनी ज्योती यांना बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात ज्योती यांची आई आणि दोन मेहुणे आले होते. त्यानंतर सर्वांनी घरी जाऊन प्रमोद जाधव यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि ते निघून गेले.
दरम्यान दोन दिवस झाले तरी प्रमोद हा घराबाहेर पडलाच नव्हता. त्यानंतर तो घरातच मृतावस्थेत आढळला. शवविच्छेदन अहवालात बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.