गडाख यांच्याकडून साहित्य परिषदेला वर्षाचे निवृत्तीवेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:57+5:302021-09-23T04:12:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेते नकोत असे जरी म्हटले जात असले तरी साहित्य संस्थांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेते नकोत असे जरी म्हटले जात असले तरी साहित्य संस्थांच्या अडचणीच्या काळात राजकारणी मंडळीच त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात,’ याचा प्रत्यय संसदेचे आणि विधान परिषदेचे माजी सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विश्वस्त आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या रूपात अनुभवायला मिळाला आहे. माजी आमदार म्हणून गडाख यांना मिळालेले वर्षभराचे ७ लाख ६८ हजार रुपये निवृत्ती वेतन त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला देणगी म्हणून दिले. या देणगीचा धनादेश आणि पत्र लेखक अरुण शेवते आणि दत्तात्रय अत्रे यांनी गडाख यांच्या वतीने मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे सुपुर्द केले.
कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेला देखील त्याची झळ बसलेली आहे, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्राच्या विस्तार कार्याच्या गतीला खीळ बसलेली आहे. ही गोष्ट विचारात घेऊन साहित्य, संस्कृतीची पंढरी असलेल्या या मातृ संस्थेला फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी माजी आमदार म्हणून मिळत असलेल्या वर्षभराच्या पेन्शनची रक्कम ७ लाख ६८ हजार रूपये देणगी स्वरूपात देत आहे,” असे गडाख यांनी प्रा. मिलिंद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
चौकट
“ गेल्या दीड वर्षांपासून परिषदेचे सभागृह, अतिथी निवास, ग्रंथालय, ग्रंथप्रदर्शन बंद होते. त्याचा मोठा आर्थिक फटका परिषदेला बसला. कार्यालय व्यवस्थापनावरचा खर्च, बँकांचे कमी झालेले व्याजदर आणि शासनाने दहा लक्ष रुपयांच्या अनुदानापैकी केवळ एक लक्ष रुपयेच अनुदान दिल्याने या नुकसानात भरच पडली. अशा काळात संवेदनशील राजकारणी आणि समाजमनस्क साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केलेली मदत मोलाची आहे” -प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप